

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिली. बाजारात राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे 90 ट्रक आवक झाली होती. मात्र, पावसामुळे भाजीपाला लवकर खराब होतो.
त्यामुळे खरेदीदारांकडून कमी प्रमाणात माल खरेदी करण्यात आला. परिणामी, फळभाज्यांमध्ये उठाव दिसून आला नाही. मागणीअभावी बटाटा, भेंडी, काकडी, कारली, फ्लॉवर, वांगी, सिमला मिरची, घेवडा, मटारच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली. (Latest Pune News)
बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने केवळ टोमॅटो आणि तोतापुरी कैरीच्या भावात वाढ झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश हिरवी मिरची 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, इंदूर येथून गाजर 8 ते 9 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 4 ते 5 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 1 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 7 ते 8 टेम्पो तर इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 50 ते 52 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 400 ते 500 गोणी, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, शेवगा 2 ते 3 टेम्पो, भुईमूग शेंग 100 गोणी, मटार 500 ते 600 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 70 ते 75 टेम्पो इतकी आवक झाली.
पालेभाज्यांमध्ये दर्जाहीन मालाचे प्रमाण अधिक
मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत घटली आहे. त्यातच जिल्हासह पुणे विभागात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम भाज्यांच्या दर्जावर झाला आहे. आवकेपैकी 50 ते 60 टक्के माल खराब व दर्जाहीन आहे. ग्राहकांकडून मात्र दर्जेदार मालाला मागणी आहे.
आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने घाऊक बाजारात मेथीच्या जुडीच्या भावात 2 रुपयांनी, शेपू आणि चुकाच्या भावात प्रत्येकी 1 रुपयाने वाढ झाली आहे. पालकच्या जुडीमागे 3 आणि पुदिन्याच्या जुडीमागे 1 रुपयाने घट झाली आहे.
उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. 27) कोथिंबिरीची सुमारे 1 लाख 25 हजार जुडी आवक झाली. जी गेल्या आठवड्यात दीड लाख जुडी होती. मेथीची मागील आठवड्यात 80 हजार जुडी झालेली आवक आज 50 हजार नोंदविण्यात आली.