मांजरी: झोपडपट्टीमधील मागासवर्गीय कुटुंबांना मोफत नळजोड व पुरेशा पाणीपुरवठ्यासह विविध मागण्यांसाठी येथील अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या वतीने हजरत राजा मोगल मंदिरासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. 116 व 72 घरकुल वसाहतीमधील प्रत्येक घरातील महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
राज्य सरकारने येथील मागासवर्गीय कुटुंबांसाठी पंचेचाळीस वर्षांपूर्वी 116, तर बत्तीस वर्षांपूर्वी 72 कुटुंबांसाठी घरकुल योजना राबवून त्यांना घरे निर्माण करून दिली आहेत. मात्र, पुरेशा सुविधा मिळत नसल्याने येथील नागरिकांना पालिकेच्या समावेशानंतर साडेचार वर्षांनीही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या विरोधात हे आंदोलन सुरू केले असून, आंदोलनाचा हा सातवा दिवस आहे.
सध्या या भागात पुरेसे पाणी मिळत नाही, पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी केली जाते. इतर अनेक ठिकाणी उघडे नळ असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. नळजोडसाठी पैसे मागितले जातात. वेळेवर कचरा उचलला जात नाही. झोपडपट्टी शेजारून वाहणाऱ्या नदीत जलपर्णी वाढली आहे. त्यातून डासांची उत्पत्ती होऊन येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, अशा तक्रारी येथील महिला सुनीता ढेकणे, पारू भंडारी, संगीता लोखंडे, मीना खरात, सावित्रा सावंत, कल्याणी जगताप, मलिका सोनवणे, उल्का चव्हाण, सुरेखा चव्हाण, कविता जाधव, भारती भंडारी, बुद्रुक भोसले, प्रकाश ढेकणे, गंगाराम खरात, मोहन लोखंडे, किशोर टाकळे यांनी केली आहे.
आम्ही पाणीपुरवठा विभागाच्या वतीने आंदोलकांची भेट घेऊन या वस्तीसाठी पुरेसा पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. सुमारे दोनशे मीटर वितरिकेचे काम झाले आहे. तीन व्हॉल्व्ह बसविले आहेत. येत्या आठ दिवसांत हे काम पूर्ण होईल. गलिच्छ वस्ती निर्मूलन विभागाचा अभिप्राय आल्यानंतर या ठिकाणी घरगुती नळजोड देण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर घेतला जाईल.शाहीदखान पठाण, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
सरकारने येथील घरकुल योजना राबवलेली असतानाही खासदार, आमदार व महापालिकेचेही या वसाहतीकडे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधींनी गेल्या चार वर्षांत एक रुपयाचाही निधी या ठिकाणी दिला नाही. पाणी, कचरा, आरोग्य, मिळकतकर या समस्या आजही आहेतच. या वस्तीची गलिच्छ वस्ती निर्मूलन अंतर्गत नोंद होऊन सर्वसुविधा मिळाल्या पाहिजेत. पाणीपुरवठा विभागाने काम सुरू केले आहे. मात्र, इतरही सेवा सुविधांबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.राजेंद्र साळवे, आंदोलक, अध्यक्ष, नागरिक कृती समिती