पुणे: गोड, रसाळ आणि नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या गावरान हापूस तसेच पायरी आंब्याचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात या आंब्याचा सुगंध दरवळू लागला आहे. सोमवारी (दि. 19) मुळशी तालुक्यातील मांडवी आणि आगळंब येथून सात ते आठ डझनाच्या दहा ते वीस डागांची आवक झाली. त्याच्या डझनाला दर्जानुसार 150 ते 200 रुपये भाव मिळाला.
गावरान आंब्याचे व्यापारी यशवंत कोंडे म्हणाले की, मागील 4 ते 5 दिवसांपासून आवक सुरू झाली आहे. मुळशी तालुक्यातील मांडवी, आगळंब येथून तयार हापूस आणि पायरीची होत आहे. हापूसल डझनाला दर्जानुसार 200 ते 300 रुपये, तर पायरीला 150 ते 200 रुपये भाव मिळत आहे. बाजारात दाखल झालेल्या या मालाला मागणीही चांगली असल्याचे यशवंत कोंडे यांनी नमूद केले.(Latest Pune News)
कच्च्या हापूस, पायरी, केशर, बदामची मोठी आवक
फळबाजारात जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, कोकणातून मानगाव भागातून आवक होत आहे. यामध्ये हापूस, पायरी, केशर आणि बदाम आंब्याचा समावेश आहे.
दरवर्षी साधारणपणे 20 मेला गावरान आंब्याची आवक होत असते. मात्र, यंदा ती 5 मेपासूनच सुरू झाली आहे. रविवारी (दि. 18) 12 ते 13 टन आवक झाली. झालेल्या आवकपैकी 8 ते 9 टन आवक ही हापूस आणि केशरची आहे. येत्या काही दिवसात ही आवक आणखी वाढणार आहे. मात्र, पाऊसाला सुरूवात झाली आहे.
हवामानातील बदलामुळे यंदा 10 दिवस आधीच हंगाम संपण्याची शक्यता आहे. दरवर्षी 30 जूनपर्यंत होणारी आवक यंदा 20 जूनपर्यंतच होण्याची शक्यता अडतदार युवराज काची यांनी वर्तविली.
गावरान कच्च्या आंब्याचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे
हापूस - 30 ते 70 रुपये
पायरी - 30 ते 50 रुपये
केशर - 30 ते 80 रुपये
बदाम - 20 ते 40 रुपये