

पुणे: ससून सर्वोपचार रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पहिलावहिला रोबोट खरेदी करण्यात आला. मात्र, तब्बल सात महिने उलटल्यानंतरही रोबोटिक शस्त्रक्रियांचा श्रीगणेशा झालेला नाही. वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्र्यांची एकत्रित वेळ मिळत नसल्याने उद्घाटन रखडलेले असल्याचे समजते.
ससून रुग्णालयात सात महिन्यांपूर्वी रोबोटिक प्रणाली दाखल झाली. प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग, मूत्रपिंड प्रत्यारोपण, अॅड्रेनालाइन ग्रंथी आणि अन्ननलिकासंबंधित शस्त्रक्रिया रोबोटिक प्रणालीमुळे सहज आणि अचूकतेने पार पडणार आहेत. (Latest Pune News)
यंत्रणा कशी वापरायची, याचे अजून डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे कारण ससून प्रशासनाकडून दिले जात आहे. मशिनचे विविध भाग टप्प्याटप्प्याने मंत्रा सर्जिकल कंपनीकडून ससूनला देण्यात आले आणि तीन महिन्यांपूर्वी संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे बसविण्यात आली.
आत्तापर्यंत कंपनीतर्फे तीन सत्रांमध्ये नऊ डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ससून रुग्णालयाच्या मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे नूतनीकरण अद्याप झालेले नाही. मॉड्यूलर ओटीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामधील स्थापत्य अभियंता विभाग आणि विद्युत विभागाकडून मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष शस्त्रक्रियांना सुरुवात होणार आहे.
रुग्णांसाठी ठरणार वरदान
तंत्रज्ञानातील अचूकता, नेमकेपणा, वेळेची बचत, कमी वेदना, यामुळे रोबोटिक शस्त्रक्रियांना अनन्यसाधारण महत्त्व झाले आहे. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये प्रामुख्याने सांधेबदलांच्या शस्त्रक्रियेमध्ये रोबोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आता हर्निया, गॉल ब्लॅडर, पोटाच्या, गायनॅकॉलिजकल अशा शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केल्या जात आहेत.
खासगी रुग्णालयांमध्ये रोबोटिक सर्जरीसाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. गरीब रुग्णांना एवढा खर्च करणे शक्य नसते. त्यामुळे ससून रुग्णालयातील रोबोटिक शस्त्रक्रिया रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळेच यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.
विभागाचे नवीन प्रमुख आणि इतर वरिष्ठ डॉक्टरांचे प्रशिक्षण अजूनसुरू आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांना सुरुवात होईल. रुग्णांना रोबोटिक शस्त्रक्रियांचा लाभ मिळणार आहे. - डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय