पुणे: शहरात विविध चौकात उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत. या पुलाखालील मोकळ्या जागेत वाहने लावण्याची सोय पालिकेने उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता महानगरपालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाच्या भूमिकेमुळे आता पुलाखालील वाहनतळ बंद होण्याची शक्यता आहे.
काही नागरिकांनी केलेल्या तोंडी तक्रारीमुळे धायरी फाटा पुलाखालील वाहनतळ बंद केला आहे. भविष्यात शहरात असणार्या उड्डाणपुलाखालील वाहनतळाबाबत तक्रारी आल्यास पुलाखालील वाहनतळ बंद करण्याबाबत विचार केला जाईल, असे पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले असून त्यामुळे शहरातील इतर पुलाखालील वाहनतळ देखील बंद होण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)
पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर तसेच अंतर्गत भागात वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यात वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग, नो पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरात महापालिकेने तब्बल 18 उड्डाणपूल बांधले आहेत. यातील काही पुलाखाली वाहने उभी करण्यास परवानगी महापालिकेने दिली आहे. काही पुलाखाली चारचाकी तर काही ठिकाणी दुचाकी वाहने लावली जातात. पुलाखाली वाहने लावण्यामुळे रस्ते रिकामे राहून वाहतूक वेगाने होते.
धायरी फाटा येथील स्वर्गीय आमदार रमेश वांजळे उड्डाणपुलाखाली देखील काही वर्षांपासून दुचाकी पार्किंग करण्यास पालिकेने परवानगी दिली होती. या पुलाखाली धायरी, नर्हेतील नागरिक आपली वाहने उभी करत होती. तसेच, हिंजवडी आयटी पार्कसह अन्य ठिकाणी कामाला जाणारे नागरिक देखील येथे त्यांची वाहने लावून आपल्या कामाला जातात.
दरम्यान, या पुलाखाली वाहने लावण्यास परवानगी देऊ नये, या बाबत काही स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या पथ विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार महापालिकेने कोणताही विचार न करता या पुलाखाली वाहने लावण्यास मनाई केली आहे. त्यामुळे आता आम्ही वाहने कोठे लावायची, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या बाबत वाहतूक नियोजन विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, या पुलाखाली वाहने लावण्यावरून काही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांसोबत पाहणी करून धायरी फाटा उड्डाणपुलाखालील दुचाकी वाहनतळ बंद करण्यात आले. अशा प्रकारे जर नागरिकांनी तक्रारी केल्यास शहरातील इतर उड्डाणपुलाखालील वाहनतळाची पाहणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.