मांडवगण फराटा: भीमा नदीच्या काठावर वसलेले मांडवगण फराटा हे गाव धार्मिक परंपरा, कृषिसमृद्धी, आधुनिक सुविधा आणि सामाजिक ऐक्य यांचा सुंदर संगम साधत शिरूर तालुक्यात आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करत आहे. सुमारे १९ हजार लोकसंख्येच्या या गावाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधत विकासाचा वेगळा आदर्श घालून दिला आहे.
लोकवर्गणीतून सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चून उभारलेले ग्रामदैवत श्री वाघेश्वराचे भव्य मंदिर हे गावाचे प्रमुख आकर्षण आहे. भीमा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने ऊस, डाळिंब, भाजीपाला आदी नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्यामुळे हा परिसर बागायती पट्टा म्हणून विकसित झाला आहे.
गावातील आठवडी बाजार, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बँका, मंगल कार्यालये आणि इतर सुविधा यामुळे परिसरातील तसेच बाहेरील नागरिकांचेही हे केंद्र बनले आहे. पावसाळ्यात भीमा नदीचा निसर्गरम्य परिसर आणि दौंड-शिरूरला जोडणारा पूल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकजूट राखण्याची परंपरा आजही कायम आहे. याच एकोप्यामुळे मांडवगण फराटा हे गाव विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे.
मांडवगण फराटाची वैशिष्ट्ये
साडेचार कोटी रुपयांत उभारलेले श्री वाघेश्वर मंदिर.
भीमा नदीवरील बंधाऱ्यामुळे बागायती शेतीला चालना.
दर शुक्रवारी भरतो मोठा आठवडी बाजार.
शिक्षण, आरोग्य, बँका व इतर आधुनिक सुविधा उपलब्ध.
चहासाठी दररोज सुमारे ११०० ते १२०० लिटर दुधाचा वापर.
सामाजिक सलोखा आणि विकासातील सर्वपक्षीय सहभाग हे गावाचे वैशिष्ट्य.