Mandar Kiwale Case Pune Pudhari
पुणे

Mandar Kivale Attack Case: मंदार किवळे हल्ला प्रकरणात आणखी तिघे अटकेत; कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडले

इंदापूरच्या पळसदेव परिसरात गुन्हे शाखेचा सापळा; हल्ल्यापूर्वी कात्रजमधील हॉटेलमध्ये झालेल्या कटाच्या बैठकीला तिघांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शिवाजीनगर न्यायालयासमोर वैमनस्यातून झालेल्या मंदार किवळे हल्ला प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी तिघांना अटक केली आहे. इंदापूर तालुक्यातील पळसदेव परिसरातून त्यांना अटक केली आहे. हे तिघे आरोपी कर्नाटकात पसार होण्याच्या तयारीत होते.

कुमार शिवाजी गाडे (वय २५), हर्षद रमाकांत साबळे (वय २४), रोहित काशिनाथ धोंगडे (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे आरोपी मंदार किवळेवर हल्ला करण्यापूर्वी आदल्या दिवशी कात्रज येथील अक्षयच्या हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला हजर होते. तेथेच किवळेच्या हल्ल्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गौहर हसन यांनी दिली. दरम्यान, यापूर्वी सहा जणांना अटक केली होती. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते.आत्तापर्यंत या गुन्ह्यात नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

शिवाजीनगर न्यायालयासमोर मंदार किवळेवर पिस्तुलातून गोळीबार करून कोयत्याने वार केल्याची घटना बुधवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी घडली. किवळे हा न्यायालयीन कामकाजासाठी आला होता. मात्र, न्यायालयासमोरील रस्त्यावर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यानंतर शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत पुण्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आदेश दिले.

‘किवळेवर हल्ला करून गाडे, साबळे, धोंगडे पसार झाले होते. तिघे जण हडपसर भागातून खासगी प्रवासी बसमधून कर्नाटकातील हुमनाबाद येथे निघाले होते. मात्र, पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील पळसदेव परिसरात सापळा लावून तिघांना पोलिसांनी पकडले, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गौहर हसन यांनी दिली. यापूर्वी अक्षय चव्हाण (वय २०), अमोल चव्हाण (वय ४८), ओंकार ऊर्फ बाब्या पवार (वय १९), सत्यम मोरे (वय २५), सूरज मळेकर (वय २२) आणि स्वप्निल गवळी (वय २८) यांना अटक करण्यात आली होती.

मंदार किवळे आणि साथीदारांनी आरोपी अक्षय चव्हाणचा भाऊ शुभमचा खून केला होता. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अक्षयने साथीदारांच्या मदतीने हल्ल्याच्या कट रचला होता. अक्षयने मध्य प्रदेशातील उमराटी येथून पप्पीभाई याच्याकडून दोन पिस्तुले खरेदी केली होती. ही पिस्तुले खरेदी करण्यासाठी त्याने प्रथमेश येनपुरे याला उमराटीत पाठवले होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

गुन्ह्यात अटक केलेल्या तीन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी हल्ला करण्यासाठी वापरलेले कोयते, वाहन जप्त करायचे आहे. तसेच, देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, कोयते कोणाकडून खरेदी केले, गुन्ह्याचा कट कुठे रचला, त्यामध्ये कोणाचा सहभाग होता, त्यासाठी आर्थिक मदत कोणी केली, याबाबत तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT