पुणे: भोर तालुक्यातील निगुडघरच्या मंडलाधिकारी रूपाली अरुण गायकवाड (वय 40) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. 4) एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी गायकवाडविरुद्ध भोर पोलिस ठाण्यात भष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराकडे दीड लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर प्रत्यक्षात एक लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई केली आहे.
तक्रारदार हा 23 वर्षीय व्यावसायिक असून, त्याने 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीसाठी 200 बास माती वाहतुकीचा परवाना तहसील कार्यालय भोर येथून घेतला होता. त्यासाठी एक लाख 26 हजार 230 रुपये रॉयल्टीपोटी भरले होते. तक्रारदाराच्या परवान्यातील गाड्यांमधून माती वाहतूक सुरू असताना आरोपी मंडलाधिकाऱ्यांनी 30 नोव्हेंबरला गाड्या अडवून पुढील वाहतुकीसाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली. पैसे न दिल्यास वाहतूक बंद ठेवण्याची धमकी देत अडवलेल्या गाड्या सोडल्या, असे तक्रारीत नमूद होते.
त्यानंतर आरोपी अधिकारी वारंवार तक्रारदाराला त्यांच्या कार्यालयात बोलवत असल्याने तक्रारदाराने 3 डिसेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी पडताळणी केली असता, गायकवाड यांनी तक्रारदारास भोर शहराबाहेरील अभिजित मंगल कार्यालयाजवळ भेटण्यास बोलावून पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सापळा रचण्यात आला. सायंकाळी 5 वाजता भोरेश्वरनगर रस्ता येथे आरोपी लोकसेविकेने तक्रारदाराकडून एक लाख रुपये लाच स्वीकारताच पंचासमक्ष तिला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुहास हट्टेकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.