मंचर: पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी प्लास्टिक कागदाची खरेदी करीत आहेत. मात्र, आखातातील युद्धजन्य स्थितीमुळे प्लास्टिकच्या दरात सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे.
कांदा झाकण्यासाठी लागणारा प्लास्टिक कागद प्रतिकिलो 130 रुपयांवरून थेट 170 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच कांदा भरण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचे दरही दहा-बारा रुपयांवरून 22 ते 24 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
दरम्यान, कांद्याला बाजारात केवळ 10 ते 12 रुपये प्रतिकिलो इतकाच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. कांदा काढणी व उत्पादनासाठीच जवळपास 10 ते 11 रुपये खर्च येत असल्याने शेतकऱ्यांना नफा तर दूरच, उलट तोटा सहन करावा लागत आहे.
वाढलेला उत्पादन खर्च आणि कमी बाजारभाव यामुळे कांदा उत्पादन आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे चित्र आहे. पावसापासून कांदा वाचविण्यासाठी प्लास्टिकचा वापर अपरिहार्य असला तरी वाढत्या दरामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.=
कांद्याला सध्या अत्यल्प बाजारभाव मिळत आहे. उत्पादन खर्च आणि काढणी खर्च जवळपास तेवढाच येतो. प्लास्टिक कागद व पिशव्यांचे दर वाढल्याने तोट्यात वाढ झाली आहे.बाबाजी मुळे, मुळेवाडी-मंचर
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे प्लास्टिकच्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे आम्हालाही वाढीव दराने माल विकावा लागतो. मागणी वाढली असली, तरी ग््रााहकांना वाढलेल्या किमतींचा फटका बसत आहे.संतोष गावडे, उद्योजक