मंचर: कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी बाजारभाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. 2) मंचरजवळील तांबडेमळा येथील नंदी चौकात जोरदार आंदोलन केले. कांद्याला किमान 25 रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येऊन ’रास्ता रोको’ करण्यात आले.
आंदोलनात काँग््रेासचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार, माजी आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके तसेच आंदोलनाचे निमंत्रक राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
सुरुवातीला आंदोलकांनी पुणे-नाशिक महामार्गालगत बैठक घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. कांद्याला सध्या मिळत असलेला अत्यल्प बाजारभाव, वाढलेला उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक व साठवणुकीचा खर्च, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्याच्या दरात भांडवली खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि कांद्याला हमीभावासारखा किफायतशीर दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. या वेळी राज्य व केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलकांच्या गळ्यात कांद्याच्या माळा घालण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, धोंडीभाऊ भोर, विशाल वाबळे, श्वेताताई ढोबळे, संजय बढेकर, शरदराव शिंदे, अल्लू इनामदार, ॲड. राजू बेंडे पाटील आदींची या प्रसंगी भाषणे झाली. सूत्रसंचालन गणेश यादव यांनी केले.
त्यानंतर आंदोलक पुणे-नाशिक महामार्गावर उतरल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही आंदोलकांनी सुमारे एक तास पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहनाच्या दूरवर रांगा लागल्या. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन मंचर पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
कांदा उत्पादक शेतकरी आज आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे. उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना बाजारभाव कोसळले आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.आ. रोहित पवार
कांदा उत्पादक शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे. बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सत्ताधाऱ्यांनी केवळ घोषणा न करता तातडीने उपाययोजना करून कांद्याला किफायतशीर दर मिळवून द्यावा.आ. बाबाजी काळे