महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. 11) कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मात्र लिलावात चांगल्या प्रतीचा कांदा अवघा 115 ते 120 रुपये प्रति 10 किलो दराने विकला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. शेतकरी असंघटित असल्याने लिलाव बंद पाडणे शक्य झाले नाही.
पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांनी एप्रिल-मे महिन्यात उत्पादित कांदा साठवून ठेवला होता. त्या काळात दर 180 ते 200 रुपये प्रति 10 किलो होते. मात्र जून-जुलैपासून कांद्याचे दर घसरू लागले. ऑगस्टपासून भाव वाढतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती; परंतु यंदा पितृपक्षात उलट दर आणखी खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Latest Pune News)
महागडी खते, औषधे, मजुरी या सर्व खर्चामुळे कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा भांडवली खर्च केला आहे. मात्र, सध्या मिळणाऱ्या दरामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, शेतकरी त्रस्त झाले आहेत.
राज्य शासनाने कांदा निर्यातीसंदर्भात कोणतेही ठोस धोरण न जाहीर केल्याची खंत व्यक्त होत आहे. कांद्यावर काजळी व मोड; बराकीत सडण्याचाही धोका दरम्यान, बदलत्या हवामानामुळे कांद्यावर काजळी व मोड येण्याचे प्रमाण वाढले असून, बराकीत सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुय्यम प्रतीचा कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत असल्याने शेतकऱ्यांसमोर ’हा कांदा आता करायचा तरी काय?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकरी संघटना निष्क्रिय
मागील काही वर्षांत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये साठवलेला कांदा चढ्या भावाने विकला गेला होता. पण यंदा दर घसरत असल्याने शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. तरीही शेतकरी संघटना शासनाला जाग आणण्यासाठी आक्रमक पावले उचलताना दिसत नाहीत, अशी चर्चा बाजारपेठेत आहे.
शासनाने खरेदी करावी मागणी
केंद्र व राज्य शासनाने तातडीने बैठक घेऊन बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत कांदा खरेदी सुरू करावी. प्रति दहा किलो किमान 200 रुपयांनी खरेदी झाली पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी मागणी आंबेगाव तालुका किसान काँग््रेास पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब इंदोरे यांनी केली आहे.
प्रति 10 किलोस मिळालेला भाव पुढीलप्रमाणे
गोळा : 120 ते 130 रुपये,
एक नंबर : 110 ते 120 रुपये,
सर्वसाधारण : 100 रुपये,
गुल्टी : 50 रुपये,
बदला : 30 रुपये.