मंचर: श्रावण महिन्यात उपवासासाठी पेरूला मागणी वाढल्याने बाजारभावात लक्षणीय वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी ३० ते ४० रुपये किलो दराने मिळणारा पेरू आता प्रतवारीनुसार ७० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला, तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे. श्रावणात उपवास करणारे अनेक नागरिक पेरूला पसंती देत असल्याने बाजारात मागणी वाढली आहे.
मात्र, यंदा पेरूची आवक तुलनेने कमी आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पेरू बागांचे नुकसान झाले. त्यातच मध्यंतरी झालेल्या पावसाचा बागांवर परिणाम झाला असून, कीड व रोगांचा प्रादुर्भावही वाढला आहे.
उत्पादनात घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरूच्या बागा काढून टाकल्या आहेत. परिणामी बाजारपेठेत पेरूची आवक कमी आणि मागणी अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या पेरूच्या दरात वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
श्रावणामुळे पेरूला मागणी वाढली आहे; मात्र पावसामुळे उत्पादन घटल्याने बाजारातील आवक कमी आहे. महिनाभरापूर्वीच्या तुलनेत दर जवळपास दुप्पट झाले असून, प्रतवारीनुसार पेरू ७० ते ८० रुपये किलो विकला जात आहे, असे मंचर येथील पेरू विक्रेता अतुल बाणखेले यांनी सांगतिले.