पुणे: अपघात झाला नसताना विमा कंपनीला खोटी माहिती देऊन दोन लाख रुपयांचा वैद्यकीय उपचार विमा मंजूर करून फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. फिटच्या आजाराने पडून जखमी झाले असताना अपघात झाल्याची बतावणी केली. तसेच, बनावट कागदपत्रे तयार करून फसवूणक केल्याचे चौकशीत उघड झाले.
याप्रकरणी महेंद्र कवडे (वय 36, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 13 फेब्रुवारी ते 7 मे दरम्यानच्या कालावधीत वानवडीतील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली होती. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवडे यांचा अपघात झाला असून, ते जखमी झाल्याची बतावणी करून त्यांना वानवडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाला खोटी माहिती देऊन बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली. ही कागदपत्रे विमा कंपनीत सादर केली होती. विमा कंपनीकडून दोन लाख तीन हजार 699 रुपयांचा वैद्यकीय उपचार विमा मंजूर करून घेण्यात आला.
दरम्यान, कवडे याने त्याच वेळी पत्नीचा मानलेला भाऊ आणि त्याच्या तीन मित्रांनी मारहाण केल्याची फिर्याद मुंढवा पोलिस ठाण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी केला होता.
चौकशीत कवडे यांना फिटचा त्रास असून, फिट आल्याने ते पडल्याने जखमी झाले होते, अशी माहिती चौकशीत मिळाली होती. वैद्यकीय उपचार विम्याचे पैसे मिळवण्यासाठी कवडे यांनी रुग्णालयाकडे बतावणी केली होती. कवडे यांचे पत्नीबरोबर कौटुंबिक वाद सुरू होते.
पत्नीने मानलेल्या भावाला अटक व्हावी म्हणून त्याने मारहाण केल्याने जखमी झाल्याची फिर्याद देण्यात आली होती. कवडे यांनी वैयक्तिक स्वार्थ, तसेच आर्थिक लाभ मिळवण्यासाठी पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब टापरे तपास करत आहेत.