पुणे: पुणे रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म क्र. 3. नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता फलाटावरून मुंबई-विशाखापट्टणम एक्स्प्रेस सुटली अन् तिला पकडण्यासाठी अलीमुद्दीन फकीर अहमद शेख घाईघाईने पळत आले. गाडी पकडण्याच्या प्रयत्नात त्यांनी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्यांचा तोल गेला.
ते प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील जीवघेण्या फटीत पडणारच होते. इतक्यात, देव पांडुरंग मदतीला धावावा, तसे आरपीएफ कॉन्स्टेबल पांडुरंग चव्हाण धावले, अन् त्यांना खेचून बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. क्षणार्धात घडलेल्या या प्रकाराने अलीमुद्दीनसह उपस्थितांच्या जीवात जीव आला. (Latest Pune News)
मंगळवार, दि. 29 जुलैच्या सकाळी 10 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास मुंबई-पुणे-विशाखापट्टणम एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 18520) हळूहळू फलाटावरून निघत होती, त्याचवेळी ही घटना घडली. 47 वर्षांचे शेख धावत्या रेल्वेत चढत असतानाच त्यांचा तोल गेला. ते खाली पडायला लागले, ते रेल्वेच्या चाकाखाली जाणार इतक्यातच फलाटावर गस्तीवर असलेल्या कॉन्स्टेबल चव्हाण यांना ही घटना दिसली.
हा जीवघेणा क्षण बघून आरपीएफ कॉन्स्टेबल चव्हाण यांनी क्षणाचाही विचार न करता, तत्काळ प्रसंगावधान दाखवले. ते विजेच्या वेगाने धावले आणि खाली पडणार्या शेख या प्रवाशाचा हात पकडला. एका क्षणात त्यांनी शेख यांना सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर ओढले. पांडुरंग चव्हाण यांनी केलेल्या या मदतीमुळे शेख यांचा जीव वाचला.
शेख यांनी कॉन्स्टेबल चव्हाण यांचे मानले आभार...
अचानक जिवावर बेतणार्या घडलेल्या या घटनेमुळे शेख पूर्णपणे घाबरले होते. चव्हाण यांनी त्यांना धीर देत प्लॅटफॉर्मवर बसवले. त्यांना पाणी पाजल्यानंतर आणि धीर दिल्यानंतर शेख यांनी त्यांची ओळख सांगितली. ते पुण्याचे रहिवासी असून, उशीर झाल्यामुळे ते धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. ते म्हणाले, मी ट्रेनखाली जाणारच होतो, पण तुम्ही देवदूतासारखे धावून आलात आणि माझा जीव वाचवलात. तुमचा मी खूप खूप आभारी आहे, असे म्हणत त्यांनी चव्हाण यांचे आभार मानले.
आमचे जवान नेहमीच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असतात. पांडुरंग चव्हाण यांनी दाखवलेली सतर्कता आणि तत्परता ही आरपीएफच्या कठोर प्रशिक्षणाचे आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. चव्हाण यांच्या या धाडसी कृत्याची नोंद आरपीएफच्या अधिकृत दप्तरातही झाली आहे. पण, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे एका प्रवाशाच्या मनात ते कायमचे ’नायक’ बनले आहेत. त्यांची ही कृती केवळ कर्तव्यपालन नसून, माणुसकी आणि संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे.- सुनील यादव, आरपीएफ निरीक्षक, पुणे रेल्वे स्टेशन