

पुणे: आमच्या इंदापूर तालुक्याला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या रूपाने कृषिमंत्रिपद मिळाले आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. शेतकर्यांसाठी त्यांच्याकडून चांगल्या कामाच्या अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
साखर संकुल येथील ऊसाच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील 135 लाख शेतकरी शेती व्यवसाय करतात. त्यांचे भवितव्य त्यांच्या हाती आले असून मी त्यांचे स्वागत करतो. त्यांनी शेतकर्यांना पहिली कर्जमाफी करावी. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे होणार्या नुकसानीत मदत मिळावी. त्यासाठी शेतकर्यांसाठी चांगल्या पध्दतीने पीक विमा योजना राबवून पीक विमा नुकसान भरपाई दयावी, असेही ते म्हणाले.
यवत येथे झालेली घटना दुदैवी
यवत येथे झालेली हिंसाचाराची घटना दुर्दैवी आहे. यवतमध्ये असे कधीही घडलेले नसून, येथे शांतताप्रिय माणसे आहेत. घडलेल्या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले असून, पोलिसांच्या तपासातून सत्य बाहेर येईल. आत्ताची गरज म्हणजे अफवांनी अशा घटना पुन्हा घडू नयेत. सर्व समाजात जातीय सलोखा राहिला पाहिजे, ही काळाची गरज असल्याचे पाटील म्हणाले.