पुणे

बारामतीत परप्रांतियाकडे मिळाले पिस्तुलासह पाच काडतुसे

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या देवेंद्र उफ बनू हुकुमचंद यादव (वय २७, मूळ रा. हांडिया खेडा, ता. खांडवा, मध्यप्रदेश) याला बारामती शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एका गावठी पिस्तुलासह पाच जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी अवैध शस्त्रे जप्त करण्यासंबंधी पोलिस ठाण्यांना आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांकडून सध्या जिल्हाभर कारवाई सुरु आहे. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांना २७ फेब्रुवारी रोजी माहिती मिळाली की, शहरातील पाटस रस्त्यावरील देशमुख चौक येथे इनामदार काॅर्नरसमोर एक संशयित कमरेला पिस्तुल लावून थांबलेला आहे. त्यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सागर ढाकणे, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, गौरव ठोंबरे, शाहू राणे, अभिजित कांबळे आदींनी तेथे पाठवले.

पोलिस पथक तेथे जाताच एक युवक त्यांना कमरेला पिस्तुल लावलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी त्याला पकडत अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तुल व पाच काडतूसे आढळून आली. तो मूळचा मध्यप्रदेशातील आहे. तो पिस्तुल विक्रीसाठी या भागात आला असावा असा पोलिसांचा संशय आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT