पुणे: महिलेचे आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर प्रसारित करणार्याला सहकारनगर पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा तालुक्यातून अटक केली. दारूची बाटली लपवून ठेवल्याच्या कारणातून त्याने महिलेला मारहाण केली होती. याची तक्रार महिलेने पोलिसात केली. त्याचा राग मनात धरून त्याने महिलेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून फरार झाला होता.
दरम्यान, या प्रकाराने मानसिकद़ृष्ट्या खचलेल्या महिलेच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. सहकारनगर पोलिसांनी तिचे समुपदेशन केले. विक्रम चंद्रकांत बुटीया (वय 38, रा. जमखंडी, चौवडियानगर, जि. बागलकोट, कर्नाटक) असे त्याचे नाव असून, तो ट्रकचालक आहे. याबाबत 26 वर्षांच्या महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
मारहाण केल्याची तक्रार महिलेने देताच सहकारनगर पोलिसांनी विक्रम बुटीयावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडे तक्रार दिल्याने त्याचा राग मनात धरून तो पुण्यातून पळून गेला. त्यानंतर त्याने त्याच्याकडे महिलेचे असलेले आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.
आरोपी बुटीया याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अंमलदार अमोल पवार व किरण कांबळे हे दोघे त्याच्या शोधासाठी कर्नाटकमध्ये गेले होते. पोलिस अंमलदार सागर सुतकर यांना माहिती काढली, तेव्हा आरोपी गोवा मापसा या दिशेने ट्रक घेऊन गेल्याची समजले.
त्यानुसार पोलिस अंमलदार अमोल पवार व किरण कांबळे हे कर्नाटकातील जमखंडीमधून त्याचा पाठलाग करू लागले. आरोपी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदामधील आनंदी हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी विक्रम बुटीया याला पकडून रात्रभर प्रवास करून पुण्यात आणले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.