

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेवर आतापर्यंत 396 हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत. यापैकी तब्बल 286 हरकती नव्याने समाविष्ट गावांमधून म्हणजेच मांजरी बुद्रुक-साडेसतरा नळी व नर्हे-वडगाव बुद्रुक प्रभागांतून नोंदल्या गेल्या आहेत. दरम्यान, हरकती नोंदवण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर असून, तक्रारी नोंदवण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)
22 ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभागरचना जाहीर केली होती. यावर हरकती व सूचना 4 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळामुळे नागरिक व कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती अजून दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे शेवटच्या आठवड्यात हरकतींचा पाऊस पडण्याची शक्यता निवडणूक शाखेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी वर्तवली आहे.
शुक्रवारी संध्याकाळपर्यंत दाखल झालेल्या 396 हरकतींपैकी 160 हरकती मांजरी बुद्रुक-साडेसतरा नळी प्रभागातून, तर 126 हरकती नर्हे-वडगाव बुद्रुक प्रभागातून आल्या आहेत. शहरातील 41 पैकी 12 प्रभागांतून एकही हरकत आलेली नाही, तर 17 प्रभागांतून केवळ एखाद-दुसरी हरकत दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ सहा प्रभागांतूनच दहापेक्षा अधिक हरकतींची नोंद झाली आहे.