टाकळी हाजी: मलठण (ता. शिरूर) येथे सोमवारी (दि. २) मध्यरात्री सुमारे एक वाजता ७ ते ८ जणांच्या सशस्त्र टोळक्याने घरात घुसून वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करत दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी एकनाथ दंडवते आणि त्यांच्या ८० वर्षीय पत्नी यमुनाबाई यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यमुनाबाई यांच्या कानातील कर्णफुले ओरबाडून काढत नाकातील नथ आणि गळ्यातील सोन्याची पोत असा अंदाजे दोन ते तीन तोळे सोन्याचा ऐवज लुटून टोळके पसार झाले. या घटनेने संपूर्ण बेट भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या दंडवते दाम्पत्याच्या घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी थेट हल्ला चढवला. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. विशेष म्हणजे, ८० वर्षीय यमुनाबाई यांच्या कानातील कर्णफुले ओरबाडून काढण्यात आल्याने त्यांना गंभीर त्रास सहन करावा लागला. वृद्ध दाम्पत्याला लक्ष्य करून झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, शिरूर पोलीस ठाणे अंतर्गत टाकळी हाजी पोलीस चौकीच्या हद्दीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. टाकळी हाजी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग आणि सहायक फौजदार राजेंद्र चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
टाकळी हाजी पोलीस चौकीच्या हद्दीत यापूर्वी विद्युत रोहित्र, विद्युत मोटारी, केबल, दुचाकी चोरी, घरफोडी तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातील काही गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेने पुढाकार घेतला होता. परिसरातील अवैध धंद्यांवरील कारवाया तसेच एमडी ड्रग्ज आणि गांजाच्या तस्करीचे प्रकार उघडकीस आणण्यातही एलसीबीची भूमिका महत्त्वाची ठरली होती.
त्यामुळे मलठणमधील या सशस्त्र दरोड्याचाही तपास स्थानिक गुन्हे शाखेलाच करावा लागणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रत्येक गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी एलसीबीच्या पथकाची प्रतीक्षा करण्याऐवजी स्थानिक पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन आरोपींचा शोध घेणे अपेक्षित आहे. केवळ घटनास्थळी भेट देणे आणि पंचनामा करणे पुरेसे नसून गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी प्रभावी तपासाची गरज असल्याची नागरिकांमधून चर्चा आहे.
थेट घरात घुसून वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जात असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.आता या प्रकरणात स्थानिक पोलीस यंत्रणा किती तत्परतेने तपास करते आणि दरोडेखोरांना कधी जेरबंद करते, याकडे संपूर्ण बेट भागाचे लक्ष लागले आहे.