पुणे: गणेशखिंड रस्त्यावरील सेंट्रो मॉलमध्ये लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी महिलेला मदत न केल्याप्रकरणी मॉलच्या प्रशासनाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका 55 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माॅलचे प्रशासकीय अधिकारी, तसेच लिफ्टची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)
सतप्रीत आवस्थी, परवेंदर कुमार, पराग हार्डे, अभिजित कोल्हटकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शिवाजीनगर भागात राहायला आहेत. खरेदी करण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी त्या गणेशखिंड रस्त्यावरील सेंट्रो माॅलमध्ये गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर दोन नातेवाईकही होते. लिफ्टमधून जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली. महिला आणि नातेवाईक लिफ्टमध्ये अडकले.
त्यांनी लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिलेबरोबर असलेल्या एका नातेवाईकाने लिफ्टच्या काचेवर हात मारला. काचेचा तुकडा उडल्याने महिलेच्या कपाळाला जखम झाली.महिला जखमी झाल्यानंतर लिफ्टची देखभाल करणारे कर्मचारी आणि माॅलच्या प्रशासन विभागातील अधिकारी, कर्मचारी तेथे आले नाही, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
निष्काळजीपणा, तसेच हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दिली.