सुहास जगताप
पुणे: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यशस्वी ठरलेला ‘सर्व पक्षीय एकत्र’ हाच पॅटर्न माळेगाव सहकारीच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार वापरण्याची शक्यता व्यक्त होत असून तशी चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात सुरू आहे.
‘श्री छत्रपती’च्या निवडणुकीत अगदी ऐनवेळी अजित पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांच्यासह तेथील विरोधकांना आपल्या बाजूला वळवून घेतले आणि निवडणुकीतील मोठा विरोध संपवत कारखाना ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे, तशीच खेळी माळेगाव सहकारीच्या निवडणुकीत अजित पवार खेळू शकतात. (Latest Pune News)
अजित पवार यांनी अशी राजकीय व्यूहरचना केल्यास सहकारमहर्षी, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि त्यांचे शिष्य रंजन तावरे हे त्याला कसा प्रतिसाद देतात यावर या व्यूहरचनेचे यश अवलंबून असेल. तावरे गुरू- शिष्य भाजपमध्ये असल्याने त्यांच्या पाठीमागेही मोठे राजकीय पाठबळ आहे. महायुतीचा हवाला देऊन अजित पवार यांना या दोघांना आपल्याकडे वळविता येईल परंतु अजित पवार त्यासाठी किती मोठी राजकीय किंमत देणार याकडेही पहावे लागेल कारण या दोघांना कारखान्यात बरोबरीची सत्ता द्यावी लागण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे अजित पवारांच्या बरोबर असताना त्यांच्या पॅनेलला दोन वेळा माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत या गुरू- शिष्याच्या जोडीने धूळ चारलेली आहे.
1997 मध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत तावरे गुरू- शिष्याच्या या जोडीने एकत्र पॅनेल करत निवडणूक लढवली आणि प्रथमच शरद पवारांसह अजित पवारांना धक्का देत माळेगाव कारखान्याची सत्ता मिळविली होती, त्यावेळी त्या पॅनेलचे सारथ्य सध्याचे कारखान्याचे अध्यक्ष असलेले अॅड. केशवराव जगताप यांनी केले होते.
2007 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये तावरे गुरू -शिष्यांनी पुन्हा पॅनेल उभे करून खा. शरद पवार, अजित पवार, चंद्रराव तावरे, बाळासाहेब तावरे, अॅड. केशवराव जगताप या दिग्गज नेत्यांच्या पॅनेलविरोधात निवडणूक लढवून 7 संचालक निवडून आणले होते. 2015 च्या निवडणुकीत तावरे गुरू- शिष्यांची तुटलेली जोडी पुन्हा एकत्र येत त्यांनी शरद पवार व अजित पवार यांच्याविरोधात पॅनेल उभे करून निवडून आणले होते, हा इतिहास आहे.
2020 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलने तावरे गुरू- शिष्यांच्या पॅनेलला धक्का देत विजय संपादन केला. यावरून एक बाब लक्षात येते की, या तावरे गुरू- शिष्यांची या ठिकाणी ताकद आहे आणि त्यांच्याशी समझोता करायचा झाला तर तेवढी राजकीय किंमत अजित पवार यांना चुकवावी लागणार आहे.
या वेळेला या दोघांशी युती करताना त्यांचे संचालक किती असणार, कारखान्याचे अध्यक्षपद कोणाला मिळणार, कारखान्यात कोणाचा शब्द अखेरचा असणार या सर्व बाबतीत अजित पवारांना तडजोड करून राजकीय किंमत द्यावी लागू शकते.
राज्यातील भाजपच्या नेतृत्वाच्या अतिशय जवळ हे दोन्ही नेते आहेत, त्यामुळे त्यांना वरिष्ठ पातळीवरूनही राजकीय पाठबळ आहे, अशा वेळेला ‘श्री छत्रपती’ चा फॉर्म्युला ‘माळेगाव’ मध्ये जर करण्यात येणार असेल तर तो राजकीयदृष्ट्या कसा होतो हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरेल. माळेगावच्या कार्यक्षेत्रात अजित पवार यांच्याकडेही मोठे राजकीय शिलेदार आहेत, त्यांच्या पचनी हा समझोता पडेल का हे सुध्दा अजित पवार यांना पहावे लागेल.
तावरे गुरू-शिष्यांचा प्रचार सुरू
कारखाना निवडणुकीची प्राथमिक प्रचार फेरी तावरे गुरू-शिष्यांनी सुरू केली आहे. गाववार बैठका घेऊन त्यांनी आखणी करण्यास सुरुवात केली आहे. सभासदांचे मत अजामावत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.