शिवनगर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात विरोधकांशी युती की लढत, याचा निर्णय होणार का? याकडे कार्यक्षेत्रातील इच्छुक आणि कार्यकर्ते, सभासदांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अजित पवार यांचा गट आणि विरोधकांनीही कार्यक्षेत्रात चाचपणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कारखाना कार्यक्षेत्रातील वातावरण तापू लागले आहे. माळेगाव कारखाना सध्या अजित पवारांच्या ताब्यात आहे. (Latest Pune News)
कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सत्ताधारी संचालक मंडळाच्या प्रमुख नेत्यांवर कार्यक्षेत्रात चाचपणी करण्याची जबाबदारी अजित पवार यांनी सोपविली होती. या प्रमुख नेत्यांनी चाचपणी करीत अजित पवारांना काही गोष्टी सांगितल्याची चर्चा आहे.
सत्ताधारी तसेच पक्षाच्या काही इच्छुक उमेदवारांनी स्वतःच्या पद्धतीने कार्यक्षेत्रातील सभासदांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे विरोधी गटातील तावरे गुरू-शिष्यांनी मागील तीन दिवसांपासून कार्यक्षेत्रात प्रचारालाच सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी सभासदांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युगेंद्र पवार कारखाना कार्यक्षेत्रातील उमेदवारांबाबत चाचपणी करीत आहेत. या पक्षाच्या वतीने काही उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितल्याचे खात्रीलायक समजते.
या निवडणुकीत पहिल्यापासूनच सक्रिय असलेल्या कष्टकरी शेतकरी कृती समितीने निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने उमेदवारांच्या मुलाखती घेत तसेच कार्यक्षेत्रातील सभासदांच्या गाठीभेटी घेऊन अगोदरपासूनच पॅनेलची तयारी सुरू केली आहे.
या सर्वांची तयारी आणि हालचालीमुळे कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, तावरे गुरू- शिष्य, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि कष्टकरी शेतकरी समिती हे पॅनेल उभे करून निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी बारामतीत अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याकडे कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांसह तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
युतीचा निर्णय होईल वरिष्ठांकडे
उपमुख्यमंत्री अजित पवार व तावरे गुरू-शिष्य यांच्यामध्ये समेट घडविण्यासाठी प्रयत्न झाल्याचे समजते. परंतु, स्थानिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांना यश आलेले नाही. वरिष्ठपातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये कारखाना निवडणुकीबाबत काही खलबते झाली, तर त्या पद्धतीने निर्णय होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.