Maharashtra civic elections 2025
पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 73 गट आणि 146 गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आला. हवेली, जुन्नर, इंदापूर, खेड तालुक्यातील गट-गणांमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. हवेली तालुक्यात 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 13 होती, ती आता 6 वर आली आहे.
गट-गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध झाल्याने ग्रामीण भागात कोणत्या गटात-गणात कोणते गाव आले आहे, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी करणे सुरू केले आहे. (Latest Pune News)
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गट-गण रचनेची अधिसूचना सोमवारी काढून ती जाहीर केली. 2011 ची जनगणना ग्राह्य धरून ही प्रारूप रचना करण्यात आली आहे. 13 तहसील कार्यालये, याबरोबरच पंचायत समिती कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप गट-गण रचनेवर 21 जुलैपर्यंत नागरिकांना जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती, सूचना नोंदवता येणार आहेत.
या प्रारूप रचनेनुसार जुन्नर, खेड आणि इंदापूर या तीन तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचे प्रत्येकी आठ सदस्य असणार आहेत. त्यामुळे 73 पैकी 24 सदस्य या तीन तालुक्यांमध्ये असणार आहेत. तर सर्वात कमी म्हणजे 2 जिल्हा परिषद सदस्य संख्या ही राजगड (वेल्हे) तालुक्यात असणार आहे.
जिल्ह्यात 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 75 तर पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या 150 होती. 2017 नंतर हवेली आणि मुळशी तालुक्यातील काही गावांचा समावेश महापालिकेच्या हद्दीत करण्यात आला. तर उरुळी देवाची-फुरसुंगी या दोन्ही गावांची मिळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समित्यांची सदस्य संख्या कमी होण्यावर झाला.
हवेली तालुक्यात 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 13 होती. आता या तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य संख्या 6 वर आली आहे. तर जुन्नर, खेड, दौंड, भोर आणि इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य संख्येत एकने वाढ झाली आहे.