शिरूरमध्ये महायुतीचा अंदाज नसल्याने इच्छुकांसह कार्यकर्ते सैरभैर file photo
पुणे

Shirur Politics: शिरूरमध्ये महायुतीचा अंदाज नसल्याने इच्छुकांसह कार्यकर्ते सैरभैर

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक लवकरच होणार

पुढारी वृत्तसेवा

उमेश काळे

टाकळी भीमा: शिरूर तालुक्यातील आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या इच्छुक आणि कार्यकर्त्यांना खरी चिंता आहे ती निवडणुका पक्ष स्वबळावर लढणार की मित्रपक्षांची महायुती करून? या मुद्द्यावर नेतेमंडळी स्पष्ट काही बोलत नसल्याने इच्छुक उमेदवार सैरभैर झाले आहेत, त्यांची प्रचार व जनसंपर्काची मोहीम थंडावली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक लवकरच होणार असून, त्याअनुषंगाने शिरूर तालुक्यातील गट व गणरचनेचा आराखडा प्रशासनाने नुकताच मंजूर केला आहे. निवडणूक लढविण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये अनेक चेहरे इच्छुक आहेत. त्यांची त्यादृष्टीने तयारी चालू आहे. (Latest Pune News)

गटात उमेदवार कोण, गणात आपल्या फायद्याचा कोण ठरू शकतो, याचे गणित लावले जात आहे. अनेक लहानमोठ्या पक्षसंघटना निवडणुकीच्या तयारीला लागल्या आहेत. अनेकांनी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुकीचे फटाके फुटणार आहेत.

युतीमधील भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आपापले उमेदवार उभे करण्यास इच्छुक आहेत. यामुळे कार्यकर्त्यांना खरी चिंता आहे ती निवडणुका पक्ष स्वबळावर लढणार की मित्रपक्षांची महायुती करून? या मुद्द्यावर नेतेमंडळी स्पष्ट काही बोलत नसल्याने इच्छुक उमेदवार सैरभैर झाले आहेत. त्यांची प्रचार व जनसंपर्काची मोहीम थंडावली आहे.

निवडणूक लढविण्यासाठी सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी चालवली असली, तरी त्यांना खरा अडथळा आहे तो म्हणजे पक्षनेत्यांच्या निर्णयाचा. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांचे महायुती सरकार सत्तेत आहे. लोकसभा व विधानसभा या निवडणुकीत तीनही पक्ष एकत्रित आहेत. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र राहायचे की नाही, याचा निर्णय स्थानिक पक्षनेत्यांवर सोडला आहे.

तीनही पक्षांचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, आमदार ज्ञानेश्वर कटके याबाबत निर्णय घेणार आहेत. शिरूर तालुक्याचा विचार केल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तिन्ही पक्ष स्वतंत्र लढणार की महायुतीत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत निर्णय तातडीने घ्यावा, यासाठी सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

निवडणूक एकत्र लढायची झाल्यास कोणता गट, गण कोणाच्या वाट्याला जाईल, हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी प्रचंड राजकीय ओढाताण होऊ शकते. कारण, प्रत्येक गट आणि गणात इच्छुकांची संख्या जास्त आहे. तिकीट न मिळाल्यास पक्षांतर किंवा बंडखोरी अपक्ष लढणार्‍यांची संख्या ही जास्त राहू शकते. सर्वच पक्षांनी स्वबळाचा निर्णय घेतल्यास स्पर्धा कमी होईल, पक्षातील अनेक इच्छुकांना संधी मिळेल. बंडखोरी झाली तरी त्या त्या पक्षापूर्ती राहील.

अजून वेळ आहे; पाहू...

स्वबळावर लढायचे की महायुतीमध्ये, याचा निर्णय झाल्यास उमेदवारांना आपली तयारी करताना पक्षाचे काम करताना योग्य नियोजन करता येईल. त्याचा फायदा पक्षाला होईल, असे कार्यकर्ते म्हणतात; तर नेतेमंडळी पाहू, करू, अजून वेळ आहे, असा वेळ काढूपणा करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT