

डोर्लेवाडी: बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेची शाळा इमारत धोकादायक असूनही शाळा प्रशासन, छत्रपती कारखाना व लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने आक्रमक झालेल्या पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
आठ दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास पुढील सोमवारी (दि.8) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग बंगल्यासमोर व माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानासमोर शाळेतील विद्यार्थी व पालक बसून आंदोलन करणार आहेत. (Latest Pune News)
येथील रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय छत्रपती कारखान्याच्या मालकीच्या इमारतीत सुरू आहे. इमारत जुनी दगडी बांधकामातील असून ती जीर्ण व धोकादायक झाली आहे. दोन वेळा स्ट्रक्चर ऑडिटही झाले आहे. या ऑडिटनुसार ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली आहे, अशा धोकादायक इमारतीत अनेक वर्षांपासून सुमारे 900 ते 1000 विद्यार्थी नियमित शिक्षण घेत आहेत.
शाळेची नवीन इमारत व्हावी यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती कारखाना व रयत शिक्षण संस्थेकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. मागील वर्षी ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी डोर्लेवाडी येथील शाळेला भेट देऊन शाळेच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांची बैठक घेतली होती. इमारतीसाठी सुमारे 4 कोटी 85 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता.
मात्र त्यानंतर इमारतीच्या जागेचा प्रश्न उपस्थित झाल्याने बांधकामाचा विषय मागे राहिला आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने इमारत बांधणे शक्य नसल्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार व कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत कारखान्याकडे शाळेची असणारी 81 गुंठे जागा ग्रामपंचायतीला परत देणेबाबत सर्वानुमते ठराव करण्यात आला आहे.
मागील संचालक मंडळाने जागा देणेबाबत खरेदी दस्तही करून घेतला होता. ग्रामपंचायतीने दस्ताची शासकीय फी 5 लाख 16 हजार रुपये शासन दरबारी जमाही केली होती. मात्र, कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष व कार्यकारी संचालक सह्या करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आले नसल्यामुळे जागेचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.
नवीन संचालक मंडळासमोर ग्रामपंचायतीने जागा नावे करणेबाबत मागील महिन्यात प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, कारखान्याचे नूतन अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व त्यांच्या संचालक मंडळाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे जागेचा व बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शाळा इमारत धोकादायक झाल्याने विद्यार्थी व पालक भयभीत असून शाळेत मुले बसवण्यासाठी भीती व्यक्त करत आहेत. शनिवारी सर्व विद्यार्थी, पालक, डोर्लेवाडी, झारगडवाडी येथील ग्रामस्थांनी शाळेवर बैठक आयोजित करून शाळेच्या बांधकामाबाबत चर्चा केली.
त्यानुसार येत्या आठ दिवसांत शाळेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजित पवार व शरद पवार यांना साकडे घातले असून, प्रश्न मार्गी न लागल्यास दोन्ही नेत्यांच्या निवासस्थानासमोर विद्यार्थी व पालक बसून आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. त्यामुळे शाळेची जागा व इमारतीच्या प्रश्नाबाबत दोन्ही नेते काय निर्णय घेतील याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
निधी असूनही शाळेचे बांधकाम होईना
डोर्लेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेची इमारत बांधण्यासाठी शरद पवारांनी या ठिकाणी भेट दिली आणि ग्रामस्थांना आवाहन करताच ग्रामस्थांकडून 34 लाख 50 हजार, पवार चॅरिटेबल ट्रस्टकडून 3 कोटी, रयत शिक्षण संस्था 1 कोटी 51 लाख असे मिळून 4 कोटी 85 लाख रुपये इतकी लोकवर्गणी देखील जमा झाली आहे. काही ठिकाणी निधीअभावी इमारतीचे काम होत नाही; मात्र डोर्लेवाडी येथे निधी असूनही इमारतीचे बांधकाम होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.