पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा सण साजरा करणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम, श्री गणरायाला पुस्तककोट अन् पूरग्रस्तांना मदत... अशा विविध विधायक कामांमुळे कसबा पेठेतील विधायक मित्रमंडळाने एक आदर्श निर्माण केला आहे.
कसबा पेठेतील फडके हौद चौकातील स्थानिक नागरिकांनी स्थापन केलेल्या या मंडळाने देखाव्यांमधूनही सामाजिक प्रबोधन केले. यासाठी मंडळाला सरहद संस्थेचा पुरस्कारही मिळाला आहे. Ganesh Chaturthi
विधायक कामांची वेगळी वाट या मंडळाने शोधली आहे. विधायक मित्रमंडळाची स्थापना स्थानिक नागरिकांनी 1963 साली केली. या मित्रमंडळाचे कार्यकर्ते कमाईतला पैसा जमा करून विधायक उपक्रमांसाठी खर्च करीत आहेत.
मंडळाकडून पूर्वी हलता देखावा सादर केला जायचा; पण पंधरा वर्षांपासून जिवंत देखावा सादर केला जात असून, त्यात व्यसनाचे दुष्परिणाम यापासून ते विविध सामाजिक विषय हाताळण्यात आले आहेत. याशिवाय उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जात असून, विधायक उपक्रमांतून आनंद आणि समाजासाठी काहीतरी केल्याचे समाधान लाभते, असे मंडळाचे कार्यकर्ते सांगतात. (Latest Pune News)
राबविलेले उपक्रम
आदिवासी वस्तीतील मुलांसोबत दिवाळी साजरी करणे
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
पूरग्रस्तांना गरजेच्या
साहित्यांचे वाटप
महिलांसाठी विविध उपक्रम
रक्तदान आणि आरोग्य
तपासणी शिबिर
कातकरी वस्तीमध्ये दीपोत्सव
महापुरुषांची जयंती साजरी करणे
सण-उत्सवात वेगवेगळे उपक्रम
मुलांना संग्रहालयाची सफर
महिलांबरोबर भाऊबिजेचा सण
पालखी सोहळ्यात वारकर्यांना जेवणाची सोय
गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक उपक्रम आम्ही आयोजित करतोच; पण मंडळाकडून वर्षभर विधायक उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्यात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. त्याशिवाय उत्सवकाळात दरवर्षी मंडळाकडून श्री गणरायाला पुस्तककोट म्हणजेच पुस्तकाचे नैवेद्य दाखविले जाते आणि यातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी दिली जातात. याशिवाय मंडळाच्या जिवंत देखाव्यांची दखल घेत काही शाळांमध्ये त्याच विषयांवरील देखावे वार्षिक स्नेहसंमेलनात सादर करण्यात आले आहेत. आमच्या मंडळाला विविध पुरस्कारही मिळाले आहेत. मंडळाचे उत्सवप्रमुख साहिल खामकर आणि मयूर निकम आहेत.
- अभिषेक मारणे, अध्यक्ष, विधायक मित्रमंडळ (कसबा पेठ)