power cut Pudhari
पुणे

Pune Mahavitaran Power Supply Shutdown: मुसळधार पावसाचा महावितरणला फटका; पुणे परिसरात अनेक भागांचा वीजपुरवठा सुरक्षेसाठी बंद

पूरस्थितीमुळे वीज यंत्रणेत पाणी शिरले; राजगुरुनगर, भोसरी, पिंपरीसह विविध विभागांत महावितरणची खबरदारी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे महावितरणकडून खबरदारीचा उपाय म्हणून विविध विभागांतील वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वीज यंत्रणेत पाणी साचल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून, महावितरणचे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येताच वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असे महावितरणतर्फे कळवण्यात आले.

महावितरणचे नागरिकांना आवाहन

पावसाची आणि पुराची परिस्थिती पाहता जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वीजपुरवठा बंद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वीज यंत्रणेच्या आसपास पाणी साचले असल्यास नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही उपकरणाला हात लावू नये. महावितरणची टीम परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अविरत काम करत आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांनी विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत, संयम बाळगावा आणि महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण पुणे परिमंडलतर्फे करण्यात आले आहे.

नागरिकांनो, येथे संपर्क करा

विजेच्या तक्रारींसाठी नागरिकांनी महावितरणच्या १९१२ आणि १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.

...अशी आहे विभागनिहाय सद्य:स्थिती

  • राजगुरुनगर विभाग

राजगुरुनगर विभागात सुरक्षेच्या कारणास्तव एकूण ५६९ रोहित्रांचा वीजपुरवठा बंद केला आहे. त्यामध्ये चाकण शहरातील २ फिडर बंद असल्याने ३३९ रोहित्र बंद आहेत. याशिवाय राजगुरुनगर उपविभागात ५, चाकण एमआयडीसीत १०१, वडगाव मावळमध्ये ३९, लोणावळ्यात ६८ आणि तळेगाव येथे १८ रोहित्रे सुरक्षेसाठी बंद ठेवली आहेत. दरम्यान, आंबेठाण गावाजवळील इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या बचाव कार्यासाठी 'एनडीआरएफ'च्या विनंतीवरून सकाळी ११.४० वाजल्यापासून ३३ केव्ही ह्युडाई, ३३ केव्ही कॉर्निंग आणि २२ केव्ही आंबेठाण फिडर काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता.

  • भोसरी विभाग

देहूगाव येथील सोसायट्यांमध्ये पाणी साचल्याने मुख्य अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार २२ केव्ही देहूगाव फीडर बंद ठेवला आहे. तसेच एफए स्विचिंग स्टेशन, सेक्टर २४ स्विचिंग आणि ईडब्ल्यूएस स्विचिंग स्टेशनमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याची पातळी आतील यंत्रणेपर्यंत पोहोचल्यामुळे सुरक्षेसाठी या केंद्रांमधून बाहेर जाणारा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

  • नगर रोड विभाग

विश्रांतवाडी शाखेतील इंदिरानगर भागात पाणी भरल्यामुळे १ रोहित्र बंद केले आहे. यासोबतच शांतीनगर आणि चव्हाण चाळ भागात पुराचे पाणी शिरल्याने येथील ३ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

  • पिंपरी विभाग

२२ केव्ही म्हाडा फिडरचे आरएमयू पाण्यात बुडाल्याने घनश्याम स्विचिंगचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. भोंडवे कॉर्नर येथे पाणी साचल्याने २२ केव्ही बीए फिडर आणि २२ केव्ही अक्षरलँड फिडरच्या आरएमयूमध्ये पाणी शिरले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून २२/११ केव्ही बीए सबस्टेशनचा वीजपुरवठा पुनावळे फिडरवरून सुरू केला आहे, तर अक्षरलँड सबस्टेशनचा पुरवठा तथावडे फिडरवरून देण्याचे काम सुरू आहे. तसेच, एम्पायर सोसायटीच्या पॅनल रूममध्ये दुपारी १.३० वाजता पाणी शिरल्यामुळे २२ केव्ही एम्पायर फेज १ फीडर 'हँड ट्रिप' करून सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT