Pune Politics: पुणे जिल्ह्यातील 21पैकी तब्बल 18 मतदारसंघांत महाविकास आघाडी आणि महायुतीतील राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांविरूद्ध अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरीचे निशाण फडकविले असल्याने अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपर्यंत हे बंड शमविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी पाच मतदार संघात बंडखोरी झाली असून कोथरुड, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला हे मतदारसंघ बंडखोरीपासून मुक्त राहिले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली असून तेथे काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे तसेच माजी नगरसेवक मुख्तार शेख यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत बंडखोरी केली आहे.
वडगाव शेरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार बापु पठारे यांच्या विरुद्ध याच पक्षाचे सुनील खांदवे यांनी बंडखोरी केली तर पर्वती विधानसभा मतदार संघात याच पक्षाच्या अधिकृत उमेदवार अश्विनी कदम यांना स्वपक्षीय सचिन तावरे यांच्या बरोबर काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागूल यांच्या बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.
हडपसर मतदारसंघात चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) यांना स्वपक्षीय आनंद अलकुंटे यांना तर प्रशांत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांना शिवसेना उबाठाचे गंगाधर बधे यांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागेल.
कोथरुड, कसबा आणि वडगाव शेरीतील बंडखोरांची मनधरणी करण्यात भाजप नेतृत्त्वाला यश आले असले, तरी शिवाजीनगर मध्ये मात्र भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पती अॅड. मधुकर मुसळे यांची बंडखोरी रोखण्यात ते अपयशी ठरले आहेत.
मुसळे यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिरोळे यांच्या अडचणीत भरच पडणार आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दत्ता बहिरट यांनाही माजी नगरसेवक मनीष आनंद यांच्या बंडखोरीचा सामना करावा लागेल.
पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तिन्ही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षातील माजी नगरसेवक व पदाधिकार्यांनी उमेदवारीअर्ज दाखल करीत बंडखोरीचे निशाण फडकाविले आहे. त्यामुळे सर्वांची डोकेदुखी वाढली आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांत सर्वत्र बंडखोरांचे पेव फुटले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही बंडखोरी शमविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. खेड, दौंड, पुरंदर, जुन्नर या मतदारसंघांत महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही राजकीय गटांमध्ये बंडखोरी झाली आहे.
तर बारामती शिरूर, भोर, आणि मावळमध्ये फक्त महायुतीमध्ये बंडखोरी झालेली आहे. इंदापूर आणि आंबेगावमध्ये फक्त महाविकास आघाडीत बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे या बंडखोरांना थंडोबा कसे करायचे यासाठी भर दिवाळीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांना कंबर कसावी लागणार आहे, हे मात्र नक्की आहे.
दौंड, पुरंदर-हवेलीत मैत्रीपूर्ण लढत
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अनपेक्षिरीत्या दौंड आणि पुरंदर-हवेली या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात आपले अधिकृत उमेदवार देऊन धक्का दिला आहे. पुरंदर-हवेलीमधून शरद पवार यांच्या पक्षाकडून तीव्र इच्छुक असलेल्या संभाजी झेंडे यांना अचानक अजित पवार यांच्या गटाने एबी फॉर्म दिला आहे, तर दौंडमधून वीरधवल जगदाळे यांना एबी फॉर्म दिला आहे. यामागे महायुतीची काय खेळी आहे, याचीच चर्चा सध्या सुरू आहे.