आर.आर.पाटील यांनी केसाने गळा कापला : अजित पवार

Ajit Pawar : चौकशीच्या फायलीवरील पाटील यांची सही फडणवीसांनी दाखवली
Ajit Pawar
अजित पवार
Published on
Updated on

तासगाव शहर : आर. आर. पाटील यांना मी नेहमी आधार दिला. त्यांनी जे मागितले ते दिले; मात्र माझ्यावर 70 हजार कोटींच्या आरोपामध्ये खुली चौकशी करण्याचे आदेश खुद्द पाटील यांनीच दिले होते, हे पाहून वाईट वाटले. त्यांनी माझा केसाने गळा कापला, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

Ajit Pawar
सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार खरं बोलले : पृथ्वीराज चव्हाण

तासगाव येथे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी अजित पवार गटातून संजय पाटील यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला, यावेळी आयोजित सभेत पवार बोलत होते. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे, दीपक शिंदे, शेखर इनामदार, अ‍ॅड. स्वप्निल पाटील, प्रभाकर पाटील, ज्योती संजय पाटील, अ‍ॅड. शिवानी प्रभाकर पाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राजवर्धन घोरपडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणार्‍या आर. आर. पाटील यांनी, माझी खुली चौकशी करावी, असे सांगत फाईलवर स्वाक्षरी केली होती. 2014 मध्ये राज्यातील सत्ताबदलानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला ती स्वाक्षरी दाखवली. आर.आर. पाटील आणि मी आम्ही एकत्र विधानसभेत गेलो होतो. एकमेकांना समजून घेऊन विश्वासात घेऊन काम करायचो. त्यांना गृहखाते हवे होते, मी त्यांना दिले. सर्वात जास्त गृहखाते उपभोगलेला माणूस पाटील आहेत. मात्र त्यांना आपल्या पदाचा वापर जमला नाही. त्यांच्याकडे भाषणकौशल्य होते, मात्र बोलून विकास होत नाही.

पवार म्हणाले, तासगावमध्ये सध्या लोकांना भावनिक करून राजकीय हित साध्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्याला बळी न पडता विकासासाठी माजी खासदार संजय पाटील यांना मत द्या. समाजातील प्रत्येक घटकासाठी आम्ही काम करतोय. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संजय पाटील यांना पाठबळ द्या. मला पंतप्रधान मोदींचे काम आवडते. देशाचा नावलौकिक, विकास या मुद्यावर ते दिवसातले वीस तास काम करत असतात.

ते म्हणाले, 2014 मध्ये ज्यावेळी विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळी निकाल लागण्यापूर्वीच राष्ट्रवादीकडून भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला. मग आता मी भाजपसोबत विकासासाठी गेलो तर काय अडचण आहे? सत्तेत राहून लोकांच्या कामांना न्याय देता यावा, यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. तासगावमध्ये येताना रस्ते, बसस्थानक, सूतगिरणी पाहिली आणि वाईट वाटले. तासगावचा विकास का झाला नाही, हा प्रश्न आता आपण स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. एकदा राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचे बटण दाबा, पुढील पाच वर्षे शेतकर्‍यांची वीजबिले माफ करू.

ते म्हणाले, संजय पाटील यांना एकदा निवडून द्या, तुमच्या तालुक्याला मंत्रीपद द्यायची जबाबदारी आमची आहे. समोरचा कितीही वेडीवाकडी भाषणे करू दे, तुम्ही आपली संस्कृती सोडून बोलू नका. विकासावर बोला. कोणतीही योजना बंद होणार नाही. विरोधक जाणून-बुजून जनतेची दिशाभूल करत आहेत, त्यांना बळी पडू नका.

माजी खासदार संजय पाटील म्हणाले, आर. आर. पाटील यांना अजित पवारांनी कायम ताकद दिली, पद दिले. मात्र त्यांनी विकासापेक्षा स्वतःची प्रसिध्दी करण्यात आयुष्य घालवले. माझ्या कार्यकर्त्यांना पदाचा धाक दाखवून दाबण्याचा प्रयत्न केला. मी विरोध करायला गेलो, तर संजय पाटील गुंडगिरी करतो, अशी आवई उठवली. अजितराव घोरपडे व माझ्यात गैरसमज करून फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, मात्र आता तो गैरसमज दूर झाला आहे.

ते म्हणाले, आमच्या कमरेच्या खाली वार करू नका, आम्ही तोंड उघडले, तर अडचणीत याल. एकत्र असतानाही जेव्हा माझ्यावर अडचणी आल्या, त्यावेळी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न याच अंजनीच्या घराने केला होता. एकदा आमदार होण्याची संधी द्या, इतिहासात नोंद होईल, एवढा निधी मतदारसंघात आणू. माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले, परिस्थितीचा गैरफायदा घेऊन गैरसमज पसरविण्यात आले. मात्र आता कवठेमहांकाळ तालुका पूर्ण संजय पाटील यांच्या पाठीशी राहील. अ‍ॅड. स्वप्निल पाटील म्हणाले, दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय घ्यायची सवय विरोधकांना आहे.

प्रभाकर पाटील म्हणाले, आताची गर्दी पाहून 23 तारखेचा निकाल लागलाय, असे म्हणायला हरकत नाही. विविध योजनांच्या माध्यमातून संजय पाटील यांनी हजारो कोटींचा निधी मतदारसंंघात आणला. मात्र ज्या विरोधकांना बाजार समितीच्या नवीन इमारतीचा दुसरा मजला चढवणे जमले नाही, त्यांनी हजारो कोटींच्या पोकळ वल्गना करू नयेत. यावेळी महेश्वर हिंगमिरे, बाबासाहेब पाटील, हणमंत पाटील, कवठेमहांकाळ नगराध्यक्ष अजित माने, अजित भोसले, बंटी भोसले, जनार्दन पाटील, भाऊसाहेब कोळेकर, अमोल ओलेकर, गौस शिरोळकर, पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.

रोहित पाटील यांनी एका व्यासपीठावर यावे ः संजय पाटील

संजय पाटील म्हणाले, रोहित पाटील यांनी 20 नोव्हेंबरच्या आत माझ्यासोबत एका व्यासपीठावर यावे. मी तयार आहे. त्यांनी गेल्या 35 वर्षातला आणि मी गेल्या दहा वर्षातला हिशेब मांडायचा. त्यानंतर लोक योग्य न्याय करतील.

कवठेमहांकाळमधून दुसरा आमदार देणार ः पवार

अजित पवार म्हणाले, आता एकदा घड्याळाच्या चिन्हावर बटण दाबून संजय पाटील यांच्या रूपाने एक आमदार निवडून द्या, कवठेमहांकाळमधून अजितराव घोरपडे याच्या रूपाने दुसरा आमदार मी देतो. मतदारसंघातील कामे मार्गी लागतील.

अजित पवार यांच्या बोलण्याने कुटुंब दुःखी : रोहित आर. आर. पाटील

माझे वडील आर. आर. पाटील यांना जाऊन आज नऊ-साडेनऊ वर्षे होत आली आहेत. इतक्या वर्षांनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगावात आर. आर. पाटील यांच्याविषयी विविध वक्तव्ये केली. ही वक्तव्ये ऐकून आमच्या कुटुंबीयांना दुःख झाले. अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मळमळ नऊ-साडेनऊ वर्षांनंतर बोलून दाखवली, अशी खंत रोहित पाटील यांनी व्यक्त केली.

Ajit Pawar
Ajit Pawar | जातीपातीचे, धार्मिक राजकारण करायचे नाही : अजित पवार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news