पुणे : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णांना दुर्धर आजारांमधील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांमध्ये कर्करोगावरील उपचारांसाठी सर्वाधिक लाभ देण्यात आला आहे. राज्यात 2022-23 मध्ये 2 लाख 17 हजार 381, 2023-24 मध्ये 2 लाख 56 हजार 286 आणि 2024-25 मध्ये 2 लाख 88 हजार 301 रुग्णांना कॅन्सरवरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी मदत मिळाली आहे.(Latest Pune News)
राज्य सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांची संख्या 1326 वरून दुप्पट केली जाणार आहे. राज्यातील 2500 रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या या योजनेत आणखी 2000 हून अधिक रुग्णालये जोडली जाणार असल्याचे शासनातर्फे सांगण्यात आले आहे. शासनाच्या आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, गंभीर दुखापत आदी आजारांवरील उपचारांसाठी सर्वाधिक मदत देण्यात आली आहे.
सध्या महात्मा फुले योजनेअंतर्गत महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये अस्थिरोग, हृदयरोग, सामान्य शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, नेत्ररोग, बालरोग, प्लास्टिक सर्जरी, रेडिएशन यांसारख्या विविध आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया, औषधे, तपासण्या आणि उपचारांचा खर्च शासनातर्फे केला जात आहे. यामध्ये 181 पूर्वीच्या उपचारांसोबतच 328 नव्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे एकूण उपचार संख्या 1356 पर्यंत पोहोचली आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये राज्यात सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांना सवाधिक लाभ मिळाला असून लाभार्थींची संख्या 33 हजार 771 इतकी आहे. त्याखालोखाल पुणे जिल्ह्यामध्ये 33 हजार 749 तर मुंबईमध्ये 33 हजार 483 लाभार्थींचा योजनेतून मदत मिळाली आहे.
राज्यात आता पूर्वीची महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि 2018 पासून सुरू करण्यात आलेली केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना एकत्रित करून राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने यंदा 4,500 कोटी रुपयांची तरतूद केली असून, सध्या 1326 प्रकारच्या आजारांचा समावेश असलेल्या योजनेत उपचारांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. अधिक खासगी रुग्णालये योजनेत सहभागी व्हावीत, म्हणून उपचार दर वाढविण्याचा प्रस्ताव असून, रुग्णालयांना या शस्त्रक्रियांसाठी दर महिन्याला मंजूर बिले आणि निधी मिळणार आहे. सध्या पुण्यासह राज्यातील 2500 रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू असून, लवकरच ही संख्या 4 हजार 500 वर नेण्याचे लक्ष्य आहे.डॉ. ओमप्रकाश शेटे, अध्यक्ष, आयुष्मान भारत मिशन समिती