पुणे : दुर्मीळ आजारांवरील महागडे उपचार आणि अवयव प्रत्यारोपणासाठी गरजू रुग्णांना मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना’ (एमजेपीजेएवाय)अंतर्गत ‘कॉर्पस फंड’ तयार करून या उपचारांचा खर्च भागविण्यात येणार आहे. यामुळे हृदय, फुप्फुस, यकृत आणि बोनमॅरो प्रत्यारोपणासह कॅथेटरच्या साहाय्याने होणाऱ्या झडपा बदलाच्या प्रक्रियांसाठी लागणाऱ्या लाखो रुपयांचा खर्च आता योजनेंतर्गत कव्हर केला जाणार आहे. (Latest Pune News)
कॉर्पस फंडाच्या माध्यमातून उच्च खर्चीक उपचारांसाठी गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रत्येक कुटुंबाला आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. आरोग्य विभागाने या बदलांसाठी तामिळनाडूच्या यशस्वी आरोग्य मॉडेलचा अभ्यास केला असून, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सर्वसमावेशक आरोग्यकवच उभारण्याची योजना आहे.
हृदय, फुप्फुस, यकृत प्रत्यारोपण, बोनमॅरो ट्रान्सप्लांट आणि हृदयातील खराब झालेल्या झडपांचा (व्हॉल्व) कॅथेटरच्या साहाय्याने बदल अशा उच्च-तंत्रज्ञान उपचारांचा खर्च दहा ते चाळीस लाख रुपयांपर्यंत जातो. आत्तापर्यंत हे उपचार ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ आणि ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’च्या परिघात नव्हते. मात्र, राज्य सरकारने विशेष समितीच्या शिफारशींनुसार या दुर्मीळ आणि खर्चीक आजारांवरील उपचारांचा समावेश योजनेत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दोन्ही योजना एकत्र करून आरोग्य संरक्षण अधिक सर्वसमावेशक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नव्या आदेशानुसार, एकत्रित योजनांची अंमलबजावणी राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत केली जाणार असून, विमा कंपन्यांचा सहभाग रद्द करून निधीचे थेट व्यवस्थापन शासनाद्वारे करण्यात येईल.
शासकीय रुग्णालयांमार्फत उपचार घेतल्यास त्या रुग्णालयांना मिळणारा निधीच त्यांच्या विकासासाठी वापरता येईल. त्यात 40 टक्के रक्कम औषधे आणि वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी, 19 टक्के पायाभूत सुविधा उभारणीसाठी आणि 20 टक्के रक्कम डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी वापरली जाणार आहे. उर्वरित 20 टक्के निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे राखीव ठेवण्यात येईल.