पुणे : शहराच्या पर्यावरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून महाराष्ट्रातील पहिली ‘ट्री अॅम्ब्युलन्स’ लवकरच पुण्यात सेवेत दाखल होणार आहे. पुणे महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभाग तसेच पर्यावरण संवर्धनासाठी अनेक वर्षांपासून काम करणार्या विविध संस्था व कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा अभिनव उपक्रम साकारला जात आहे. (Pune News Update)
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.5 जून) सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजी उद्यानात या ट्री अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन होणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित राहणार आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ’अंघोळीची गोळी’ संस्थेचे माधव पाटील म्हणाले, कुणी प्रत्यक्ष झाडांवर काम करतंय, कुणी जनजागृती करतंय आणि या सर्व प्रयत्नांमुळेच ट्री अॅम्ब्युलन्ससारखी कल्पना प्रत्यक्षात उतरत आहे. ही आपली सामूहिक जबाबदारी आणि यश आहे.
पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचेही पाटील यांनी सांगितले. ’अंघोळीची गोळी’ आणि ’खिळेमुक्त झाडं’ या मोहिमांद्वारे गेली सात वर्षे झाडांवरील खिळे काढण्याचे काम सातत्याने सुरू आहे.
यामध्ये हजारो झाडांवरील लाखो खिळे काढण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रशासनालाही पर्यावरणपूरक धोरणे राबवावी लागली, असे पाटील यांनी नमूद केले. 5 जूनपासून सुरू होणारी ही ट्री अॅम्ब्युलन्स झाडांच्या दुखापतींची तातडीने दखल घेऊन उपचार करणारा एक अनोखा उपक्रम ठरेल. हवामान बदलाच्या संकटात ही सेवा मोठा फरक घडवू शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
झाडांसाठी ही अत्यंत अत्याधुनिक अशी ट्री अॅम्ब्युलन्स असेल. सुरुवातीला पालिका हद्दीतील रस्त्यांवरील झाडांवर विशेष लक्ष दिले जाईल. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे.अशोक घोरपडे, प्रमुख, उद्यान विभाग, पुणे महानगरपालिका
ट्री अॅम्ब्युलन्समध्ये मुख्यत्वे झाडांना ठोकलेले खिळे काढण्यासाठी विविध साधने असतील. याचबरोबर झाडांभोवती लावलेले पिंजरे कापण्यासाठी गॅस कटर, फांद्या काढण्यासाठी शिडी (लॅडर), छोटे क्रेन, झाडांच्या कुंपणाभोवती असलेले पेव्हर ब्लॉक आणि सिमेंट काढण्यासाठी कुदळ आणि फावडे असणार आहे. या ट्री अॅम्ब्युलन्समध्ये उद्यान विभागाचे कर्मचारीही उपलब्ध असतील.