Winter Pudhari
पुणे

Maharashtra Winter Forecast: महाराष्ट्रात गुलाबी थंडीला आणखी विलंब! १२ नोव्हेंबरनंतरच गारठा वाढण्याचा अंदाज; चक्रीवादळाचा परिणाम

८ नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता; यंदा किमान तापमान १३ ते १४ अंशांवर स्थिर राहण्याचा हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अर्णब चक्रीवादळाने गार वाऱ्यांचे झोत आणले. त्यामुळे राज्यातील बहुतांश शहराचे कमाल-किमान तापमान घटले. मात्र, ढगाळ वातावणामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला जाणवणारी गुलाबी थंडी यंदा एक आठवडा उशिरा जाणवण्यास सुरुवात होईल. थंडीची सुरुवात दि. १२ नोव्हेंबर पुढे होईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीची सुरुवात होते. मात्र, सध्या बंगालच्या उपसागरातून देशभरात मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे ढगांचा मुक्काम राज्यात दि. ८ नोव्हेंबरपर्यंत राहील, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.

दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानाचा पारा ११ ते १३ अंशांवर खाली येतो. दुसऱ्या आठवड्यापासून तो १० ते ११ अंशांवर येतो. तसेच डिसेंबर, जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी जाणवते. मात्र, यंदा अल-निनोचा प्रभाव थंडीवरही दिसणार आहे.

चक्रीवादळामुळे थंडी कमीच

हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात किमान तीन चक्रीवादळे येणार आहे. त्यापैकी पहिले चक्रीवादळ अर्णब नावाने आता आले आहे. अजून दोन चक्रीवादळांचा अंदाज आहे.

त्यामुळे वारंवार बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रभावामुळे थंडीत घट होणार आहे. थंडी राहील, पण किमान तापमान १३ ते १४ अंशांवर स्थिर राहील. किमान तापमान १० अंशांखाली जाण्याची शक्यता कमी आहे. ते गेलेच तर फार काळ गारठा राहणार नाही, असाही अंदाज जागतिक हवामान संघटनेने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT