Flight Pudhari
पुणे

Maharashtra Flight Routes: आता पुण्याहून अमरावतीलाही जा उडत... ‘उडान’मध्ये सोलापूर-मुंबई आणि अमरावती- पुणे हवाई मार्गांची निवड

केंद्राच्या सुधारित ‘उडान’ योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड; सोलापूर आणि अमरावतीला प्रमुख शहरांशी जोडण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सुधारित ‘उडान’ योजनेअंतर्गत सोलापूर- मुंबई आणि अमरावती-पुणे या दोन हवाई मार्गांची निवड केली आहे. या दोन्ही मार्गांवर दोन्ही दिशांनी विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे सोलापूर

आणि अमरावतीसारख्या शहरांना राज्यातील प्रमुख आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रांशी थेट जोडण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

सुधारित ‘उडान’ योजनेअंतर्गत आव्हानाधारित निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत प्रत्येक राज्याला चार हवाई मार्ग आणि दोन विमानतळ प्रस्तावित करण्याची संधी उपलब्ध आहे.

संबंधित राज्यातील प्रवाशांची गरज, प्रादेशिक संपर्काचे महत्त्व आणि हवाई वाहतुकीच्या विस्ताराची क्षमता लक्षात घेऊन मार्ग प्रस्तावित करता येणार आहेत. याच संधीचा उपयोग करत महाराष्ट्रासाठी सोलापूर-मुंबई-सोलापूर आणि अमरावती-पुणे-अमरावती या मार्गांची निवड केली आहे.

सोलापूर आणि अमरावतीसाठी महत्त्वाची संधी

सोलापूर हे वस्त्रोद्योग, व्यापार, धार्मिक पर्यटन आणि कृषी आधारित उद्योगांसाठी ओळखले जाणारे महत्त्वाचे शहर आहे. सोलापूर ते मुंबई थेट हवाई संपर्क उपलब्ध झाल्यास व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक तसेच विविध कामांसाठी मुंबईला जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होऊ शकतो.

त्याचबरोबर सोलापूरच्या औद्योगिक आणि पर्यटनविषयक संधींनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, अमरावती हे विदर्भातील महत्त्वाचे शैक्षणिक, व्यापारी आणि कृषी केंद्र आहे.

पुणे हे उच्च शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, उद्योग आणि रोजगाराच्या संधींसाठी देशातील प्रमुख शहरांपैकी एक आहे. अमरावती आणि पुणे यांच्यात थेट हवाई संपर्क निर्माण झाल्यास विद्यार्थी, पालक, उद्योजक, व्यावसायिक आणि नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. विशेषतः विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार करताना सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवले आहे. विमानप्रवास ही केवळ मोठ्या शहरांतील नागरिकांची सुविधा न राहता देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांनाही त्याचा लाभ मिळावा, हा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रासाठी सुधारित ‘उडान’ योजनेअंतर्गत सोलापूर- मुंबई आणि अमरावती- पुणे या हवाई मार्गांची निवड केली आहे, ही आनंदाची बाब आहे. सोलापूर आणि अमरावतीसारख्या महत्त्वाच्या शहरांना मुंबई व पुण्याशी थेट जोडल्यामुळे विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी, पर्यटक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. हवाई संपर्क म्हणजे केवळ दोन शहरांमधील अंतर कमी करणे नव्हे, तर त्या शहरांमधील शिक्षण, रोजगार, व्यापार आणि विकासाच्या संधी जवळ आणणे होय. महाराष्ट्रातील अधिकाधिक शहरांना सक्षम हवाई वाहतुकीच्या जाळ्याशी जोडण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी प्रादेशिक हवाई संपर्काचा विस्तार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT