Pune Water Cut News: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! आठवड्यातून एक दिवस गुरुवारची पाणीकपात सुरू

परिस्थितीनुसार आठवडाभरात महापालिका करणार २० टक्के कपातीचे नियोजन
Water Cut
Water Cut(Pudhari File Photo)
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणेकरांना आता पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. खडकवासला धरणसाखळीतील जलसाठ्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत घट झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर कपातीचे संकट अधिक गडद झाले आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ऑगस्ट २०२७ अखेरपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेला पाणीवापराचे नव्याने नियोजन करावे लागणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांना २० टक्के पाणीकपातीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिका आठवडाभरात कपातीचा आराखडा तयार करणार आहे.

मात्र, शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी माध्यमांना सांगितले.

शहरातील पाणीपुरवठा नियंत्रित करण्यासाठी गुरुवारपासून पाणीबंदी लागू झाली आहे. या उपाययोजनेमुळे १० टक्के पाणीकपात होत असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी गुरुवारी दिली.

Water Cut
Pune Police Recruitment Scam: पुणे पोलिस भरतीत मोठा गैरप्रकार! कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांमुळे १९ जणांची नोकरी जाणार

आयुक्त राम म्हणाले, यापुढे आणखी कपात करायची झाल्यास ती कोणत्या भागात आणि कोणत्या पद्धतीने करायची, याचा विचार सुरू आहे. शहरातील काही भागांत पुरेसा पाणीपुरवठा होत असताना काही भागांतील नागरिकांना आधीपासूनच कमी दाबाने किंवा अपुऱ्या प्रमाणात पाणी मिळत आहे.

त्यामुळे संपूर्ण शहरात सरसकट कपात करण्याऐवजी भागनिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे.

Water Cut
Pune Kharadi Engineer Case: पुण्यात सायबर फसवणुकीच्या धमकीनंतर तरुण अभियंत्याचा मृत्यू; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

खडकवासला धरणसाखळीत मृतसाठा आणि बफर साठा वगळता २० टीएमसी पाणी उपलब्ध आहे. हा साठा दरवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी कमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली.

उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता, पुढील वर्षी ऑगस्टअखेरपर्यंत शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी आतापासूनच काटकसरीने पाणी वापरण्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे.

या बैठकीत जलसंपदा विभागाने पुणे शहरात २५ टक्के पाणीकपात करण्याची गरज व्यक्त केली. दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांना २० टक्के कपातीच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे महापालिका प्रशासनासमोर उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करताना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, अशा पद्धतीने कपात लागू करण्याचे आव्हान आहे. कपात नेमकी कधीपासून आणि कशा पद्धतीने लागू करायची, याबाबतचा निर्णय आठवडाभरात घेतला जाणार आहे.

पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त भरारी पथके स्थापन करा

अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी महसूल, महावितरण, पोलिस आणि जलसंपदा विभागाची संयुक्त भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनधिकृत पाणीउपशासाठी वापरण्यात येणारे पंप व मोटारी जप्त करण्यात येणार आहेत.

तसेच पाणीचोरी आढळल्यास संबंधितांची वीजजोडणी खंडित करण्यासाठी महावितरणने कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. पाणीउपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्तही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

पाणीकपातीचे वेळापत्रक अद्याप झाले नाही निश्चित

गुरुवारची पाणीबंदी सुरू झाली असली, तरी वडगाव जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या काही भागांचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. या भागांमध्येही गुरुवारीच पाणीबंदी लागू करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

मात्र, त्याबाबतचे अंतिम वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे आगामी काळातील पाणीकपातीचे नियोजन आणि पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

धरणात गेल्या वर्षी या काळात १०० टक्के पाणी शिल्लक होते. यंदा हे प्रमाण ८० टक्क्यांवर आले आहे. अल-निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने १० टक्के पाणीकपात सुरू केली आहे. आठ दिवसांत पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करून पाणीकपात २० टक्के करायची की १० टक्के कायम ठेवायची, याचा निर्णय घेतला जाईल.

- नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news