TET Exam Pudhari
पुणे

Maharashtra TET Exam 2026: महाराष्ट्र टीईटीसाठी विक्रमी नोंदणी; सहा लाख उमेदवार परीक्षा देणार

21 जूनला परीक्षा; वाढत्या स्पर्धेमुळे उमेदवारांची संख्या मोठी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या 21 जूनला शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला यंदा रेकॉर्ड बेक उमेदवारांनी नोंदणी केली असून, तब्बल सहा लाख उमेदवार संबंधित परीक्षा देणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

परीक्षा परिषदेने 25 मार्चला टीईटीचे वेळापत्रक जाहीर केले. या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 27 मार्च ते मुदतवाढीसह 24 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती. आता अर्जांची अंतिम प्रक्रिया सुरू आहे. टीईटी परीक्षेचे अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 9 ते 21 जूनदरम्यान प्रवेश अर्जाची मुद्रित प्रत उपलब्ध करून दिली जाणार आहे. 21 जून रोजी सकाळी साडेदहा ते एक या वेळेत टीईटी पेपर क्रमांक 1 होईल.

त्यानंतर पेपर क्रमांक 2 दुपारी अडीच ते पाचदरम्यान होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

तसेच, सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता सेवेत असलेल्या शिक्षकांना किंवा शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. त्यामुळे टीईटी परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या परीक्षेला पावणेपाच लाख उमेदवारांची नोंदणी

परीक्षा परिषदेतर्फे 23 नोव्हेंबर 2025 रोजी टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला दोन्ही पेपर मिळून 4 लाख 75 हजार 669 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 4 लाख 46 हजार 730 उमेदवारांनी परीक्षा दिली, तर 28 हजार 939 उमेदवारांनी दांडी मारली, तर संबंधित परीक्षेत तब्बल 50 हजार 369 उमेदवार उत्तीर्ण झाले.

विषयतज्ज्ञांकडून योग्य प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या 21 जूनला परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येत आहे. यंदा अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे जबाबदारी देखील वाढली आहे.
डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT