कात्रज: राज्यातील अंशतः अनुदानित व अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघाने ७ व ८ जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाची घोषणा केली आहे. या दोन दिवसांत राज्यातील सर्व अंशतः अनुदानित व अनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार असून, शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक समन्वय संघाचे खंडेराव जगदाळे यांनी केले आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यातूनच राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील अंशतः अनुदानित व अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून शासनापर्यंत आपल्या न्याय्य मागण्या पोहोचवाव्यात, असे आवाहन संघटनेने केले आहे.
वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे सेवा बजावूनही शिक्षकांना आर्थिक व प्रशासकीय न्याय मिळालेला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत; अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिक्षक समन्वय संघाच्या वतीने देण्यात आला आहे.