किशोर बरकाले
पुणे: राज्यात यंदाचा ऊसगाळप हंगाम मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार साखर आयुक्तालयाच्या ऑनलाइन प्रणालीवर आत्तापर्यंत १२७ साखर कारखान्यांकडून गाळप परवान्यासाठी अर्ज प्राप्त झालेले आहेत.
यंदाच्या हंगामात उसाची उपलब्धता तुलनेने कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे परवाना मिळताच घोषित तारखेनुसार पहिल्या टप्प्यात दैनंदिन मोठ्या गाळप क्षमतेच्या कारखान्यांकडून कार्यक्षेत्राबाहेरील उसाच्या पळवापळवीच्या स्पर्धेची दाट शक्यता असल्याची चर्चा साखर वर्तुळात सुरू आहे.
साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या ऑनलाइन क्रशिंग लायसन्स या ऑनलाइन प्रणालीवर गाळप परवाना मिळण्यासाठी कारखान्यांनी अर्ज करावयाचा आहे. त्यानुसार सद्य:स्थितीत हंगाम २०२६-२७ साठी ६६ सहकारी, ६१ खासगी मिळून एकूण १२७ कारखान्यांनी प्रस्ताव ऑनलाइन भरण्यास सुरुवात केली आहे.
प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयनिहाय स्थिती पाहता अहिल्यानगरमध्ये २२, अमरावती १, छत्रपती संभाजीनगर १६, कोल्हापूर २४, नागपूर १, नांदेड १८, पुणे २१, सोलापूर २४ प्रस्ताव ऑनलाइनद्वारे भरले असून, उर्वरित प्रस्ताव प्रत्यक्षात प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात दाखल झाल्याचे सांगण्यात आले.
साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात आयुक्तालयाने ऊसगाळप हंगामाचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार प्राप्त प्रस्तावांच्या छाननीसही प्राधान्य देण्यात येणार आहे.
परिपूर्ण प्रस्तावांना साखर आयुक्तांची मान्यता घेऊन ऑनलाइनद्वारेच गाळप परवाना वितरित करण्यात येणार आहे. ज्यामुळे कारखान्यांना घोषित केलेल्या तारखेनुसार वेळेत हंगाम सुरू करता येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली.
दरम्यान, राज्यात यंदा १५.४८ लाख हेक्टरवर उभ्या उसाचे पीक आहे. त्यातून सुमारे १२५० लाख मे. टन ऊस उपलब्ध होईल, असा प्राथमिक अंदाज साखर आयुक्तालयासह सामंजस्य करार झालेल्या मिटकॉन या संस्थेकडूनही वर्तविण्यात येत आहे.
...तरच हंगाम १५ ऑक्टोबर-पासून नियमित सुरू होईल
राज्यात यंदा मराठवाड्यासह काही भागात पावसाअभावी पाणी उपलब्धता घटली आहे. त्याचा विपरीत परिणाम यंदाच्या हंगामावर होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच ६० टक्के खोडवा ऊस असल्यामुळे साखर उताऱ्यावरही परिणाम होऊ शकतो.
शिवाय कारखान्यांनी हंगामपूर्व केलेली तयारी, वेळेत ऊसतोडणी मजुरांची उपलब्धता, वाहतूक व्यवस्था आणि उसाच्या पक्वतेनुसार तोडणी हे गणित कसे राहते, त्यावरच हंगामाचा वेग दिसून येणार आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १५ ऑक्टोबरपासून ऊसगाळप सुरू करण्यास विरोध केलेला आहे