Sugar Factory Pudhari
पुणे

Maharashtra Sugarcane Crushing Season: राज्यात १३८ साखर कारखान्यांची धुराडी पेटली; १.३२ कोटी टन ऊस गाळप, १०.८७ लाख टन साखर उत्पादन

पुणे विभाग गाळपात आघाडीवर; शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांचा हंगाम वेग घेणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात १३८ सहकारी साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू असून, सद्य:स्थितीत १३२ लाख ७ हजार टनांइतके ऊस गाळप पूर्ण झालेले आहे. तर, सरासरी ८.१९ टक्‍के उताऱ्यानुसार साखरेचे १०.८७ लाख टनाइतके उत्पादन तयार झालेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित झाल्यामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने सुरू होण्याचे प्रमाण आता वाढणार आहे.

त्यामुळे पुढील पंधरवड्यात गाळप हंगाम घेणाऱ्या एकूण साखर कारखान्यांची संख्या वाढून खऱ्या अर्थाने गाळप हंगामास वेग येणार असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून मिळाली. सध्या ६४ सहकारी आणि ७४ खासगी मिळून १.३८ कारखान्यांची धुराडी सुरू आहेत. त्यामध्ये विभागनिहाय स्थिती पाहिली, तर पुणे विभागातील २७ कारखान्यांनी सर्वाधिक ३७.३२ लाख टन ऊस गाळप आणि सरासरी ८.९१ टक्‍के उताऱ्यानुसार ३३.२६ लाख क्विंटल साखर उत्पादन तयार करीत हंगामाच्या सुरुवातीला आघाडी घेतली.

तर, ऊस गाळपात सोलापूर विभाग दुसऱ्या स्थानावर आहे. या विभागातील ३० कारखान्यांनी मिळून २५.१९ लाख टन ऊस गाळप पूर्ण केले. तर, ७.५९ टक्‍के उताऱ्यानुसार १९.११ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे दि.५ नोव्हेंबरअखेरच्या अहवालानुसार कोल्हापूर विभागात १७ कारखानेच सुरू राहिले. या विभागात १४.६८ लाख टन ऊस गाळप झालेले आहे. तर, राज्यात सर्वाधिक ९.४१ टक्‍के निव्वळ साखर उतारा असून, १३.८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे.

ऊस गाळपाबाबतची विभागनिहाय स्थिती पाहता अहिल्यानगर विभागात २०.८ लाख टन, छत्रपती संभाजीनगर १५.२४, नांदेड १७.९६ लाख टन,अमरावती १.५१ लाख टन असून, नागपूर विभागातील कारखान्यांचा हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. उतारा स्थिती पाहता नांदेड विभागाचा उतारा सर्वात कमी म्हणजे ७.५५ टक्‍के, छत्रपती संभाजीनगर ७.४३, अमरावती ७.५५, अहिल्यानगर विभागाचा उतारा ८.११ टक्‍के आहे.

यंदाच्या २०२६-२७ मधील हंगामाच्या नियोजनानुसार ऊस गाळप हंगाम सुरू आहे. प्राप्त प्रस्तावांच्या छाननीअंती आजअखेर साखर आयुक्तालयाकडून २०० कारखान्यांना यंदाचे ऊस गाळप परवाने देण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात १३८ साखर कारखान्यांनी हंगामही सुरू केलेला असून, ऊस गाळप यापुढे आणखी वेगाने सुरू होण्याची अपेक्षा आहे. राज्यात सुमारे ११ लाख टनाइतके साखरेचे नवे उत्पादन तयार झालेले आहे.
डॉ. संजय कोलते, साखर आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT