पुणे: राज्यात सद्यःस्थितीत 777 लाख 41 हजार 466 मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर 9.1 टक्के निव्वळ उताऱ्यानुसार साखरेचे 71 लाख मे.टन इतके उत्पादन तयार झालेले आहे. राज्यातील 206 साखर कारखान्यांकडून प्रतिदिन 10 लाख 43 हजार 550 मे.टन ऊसगाळप सुरू असून हंगाम जोमाने सुरू आहे. पुढील आठवड्यानंतर कारखान्यांचा हंगाम ऊस संपत आल्याने बंद होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयातून वर्तविण्यात आला.
मंत्री समितीच्या ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या बैठकीत यंदाच्या 2025-26 च्या हंगामात ऊस पीक उपलब्धता, साखर उत्पादन, उतारा व आनुषंगिक माहितीचा अहवाल साखर आयुक्तालयाकडून मांडण्यात आला. त्यांनी राज्याचा कृषि विभाग आणि मिटकॉन संस्थेकडूनही याबाबतचा अहवाल करून एकत्रित माहिती मंत्री समितीसमोर ठेवली होती. त्यानुसार राज्यात ऊस पिकाखालील क्षेत्र हे 14 ते 16 लाख हेक्टरइतके आहे, तर उसाची प्रति हेक्टरी उत्पादकता 76 ते 78.71 मे.टनाइतकी अपेक्षित धरण्यात आली आहे.
साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या ऊस गाळप हंगामाचे नियोजन करण्यात आलेले आहे. राज्यात यंदा किमान 1200 लाख मे.टन उसाचे गाळप हंगामपूर्व अंदाजानुसार गृहित धरण्यात आले होते. याचा विचार करता अद्यापही 400 लाख मे.टनाच्या आसपास ऊस गाळप बाकी असल्याचे दिसून येत आहे. हंगामअखेरीस राज्यात साखरेचे एकूण 105 लाख मे.टनाइतक्या उत्पादनाचा अंदाज आहे. सध्याची ऊस गाळप क्षमता विचारात घेतल्यास शिल्लक उसाचे गाळप हे फेबुवारी महिनाअखेर किंवा 10 मार्चपर्यंत चालून यंदाचा हंगाम संपुष्टात येण्याची अपेक्षा आहे.महेश झेंडे, साखर सह संचालक (विकास), साखर आयुक्तालय, पुणे.