पुणे: राज्यात यंदाचा गाळप हंगाम 2025-26 मध्ये सातारा जिल्ह्यातील 3 आणि सोलापूर जिल्ह्यातील 2 साखर कारखान्यांनी विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्याचा अहवाल साखर आयुक्तालयात प्रादेशिक साखर सह संचालक कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे. त्यावर साखर आयुक्तालयाने संबंधित पाच साखर कारखान्यांना नोटिसा बजावल्या असून, त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी येत्या सोमवारी (दि.27) दुपारी 12 वाजता सुनावणी ठेवण्यात आली असल्याची माहिती डॉ. संजय कोलते यांनी दिली. (Latest Pune News)
सातारा जिल्ह्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (रेठरे, ता.कराड), जयवंत शुगर्स प्रा.लि. (धावरवाडी, ता.कराड), ग््राीन पॉवर शुगर्स प्रा.लि. (गोपुज, ता.खटाव) या 3 साखर कारखान्यांचा समावेश आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. (वेणुनगर, गुरसाळी, ता.पंढरपूर) आणि श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.-युनिट नं. 2 (करकंब, ता.पंढरपूर) या 2 साखर कारखान्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण, ऊस गाळप आणि ऊस पुरवठा नियमन) आदेश 1984 व त्यामध्ये झालेल्या सुधारणानुसार हंगाम सुरू करण्यापूर्वी गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. तसे परिपत्रक साखर आयुक्तालयाने दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी जारी केले आहे. त्यानुसार साखर कारखान्यांनी गाळप परवाना प्राप्त करून घेऊनच गाळप हंगाम सुरू करावा, अशा सूचना सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना दिलेल्या आहेत. संबंधित कारखान्यांना साखर गाळप परवाना प्राप्त करून न घेता गाळप हंगाम 2025-26 सुरु केल्याने प्रादेशिक साखर सह संचालक पुणे आणि सोलापूर यांनी माहिती कळविली आहे. तसेच कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे प्रस्तावीत आहे.
कारखान्यावर दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येत आहे. त्यानुसार कारखान्यांनी साखर आयुक्त तथा परवाना अधिकारी यांच्यासमोर दिनांक 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता सुनावणीत आवश्यक कागदपत्रांसह तसेच अद्ययावत गाळपाच्या माहितीसह स्वतः हजर रहावे, अशी नोटीस साखर संचालक (प्रशासन) डॉ. केदारी जाधव यांनी कारखान्यांना बजावली आहे.
मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदाचा 2025-26 चा हंगाम हा दिनांक 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यापूर्वीच कारखान्यांकडून ऊस गाळप हंगाम सुरू करण्यात आल्याची गंभीर दखल साखर आयुक्तालयाने घेतली आहे.