Sugarcane Weight Pudhari
पुणे

Sugar Factory Weighbridge Inspection: ऊस गाळप हंगामापूर्वी १६२ साखर कारखान्यांचे वजनकाटे सील; काटामारी रोखण्यासाठी सरकारची तपासणी मोहीम

वैधमापन शास्त्र विभागाकडून वजनकाट्यांची पडताळणी व मुद्रांकन पूर्ण; ऊस वजनातील तक्रारींसाठी जिल्हानिहाय व्हॉट्सॲप क्रमांकही जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात यंदाच्या २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामात प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या नियोजनातून सहकारी व खासगी मिळून आत्तापर्यंत १६२ कारखान्यांच्या वजनकाट्यांची पडताळणी, मुद्रांकन (स्टॅम्पिंग) व सीलिंग प्रक्रिया वैधमापन शास्त्र विभागामार्फत करण्यात आलेली आहे. उर्वरित कारखान्यांची प्रक्रिया नियोजनानुसार सुरू असून, ऊस वजनमापांचे कामकाज पारदर्शक ठेवण्यासाठी प्राधान्याने काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, उसाच्या वजनकाट्यांच्या तक्रारींसाठी जिल्हानिहाय तक्रार निवारणासाठी वैध मापनशास्त्र विभागाकडून व्हॉट‌्सॲप क्रमांकही जाहीर करण्यात आल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले. त्यामुळे उसाच्या काटामारीबाबतच्या शेतकरी संघटनांकडून होत असलेल्या तक्रारींची दखल घेऊन कामकाज सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील यंदाच्या हंगामासाठी ऊस गाळप करण्याकामी साखर आयुक्तालयाकडे एकूण २१४ साखर कारखान्यांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यातून २०० कारखान्यांना ऑनलाईनद्वारे परवानेही वितरितही करण्यात आले आहेत.

साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी वजनकाट्यांबाबत वैधमापन शास्त्र विभागामार्फत साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणी व सीलिंगची कार्यवाही प्रत्यक्ष शेतकरी गट, शेतकरी संघटना प्रतिनिधींच्या उपस्थितीत समक्ष पूर्ण करण्याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व प्रादेशिक साखर सहसंचालकांना ३० सप्टेंबर २०२६ रोजी दिल्या होत्या. त्यानुसार क्षेत्रीय स्तरावर कामकाज पूर्ण होऊन १६२ कारखान्यांनी स्टॅम्पिंग पूर्ण केलेले असल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT