Exam Pudhari
पुणे

SSC HSC Supplementary Exam: दहावी-बारावी पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जूनमध्येच परीक्षा होणार

अनुत्तीर्ण आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना पुन्हा संधी; 1.17 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेस बसणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तसेच श्रेणी सुधार विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा 16 ते 30 जूनदरम्यान, तर बारावीची परीक्षा 16 जून ते 8 जुलैदरम्यान होईल, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे.

राज्य मंडळातर्फे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या श्रेणी सुधार परीक्षा दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात घेतली जाते. यंदा पहिल्यांदाच संबंधित परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाने पुरवणी आणि श्रेणी सुधार परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली, तर आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 12 मेपासून सुरू करण्यात आली आहे.

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची सर्वसाधारण, द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम, माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन तसेच लेखी परीक्षा 16 जून ते 8 जुलैदरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा त्याचदरम्यान होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 16 ते 30 जूनदरम्यान पार पडणार आहे. तसेच प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा त्याचदरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

पुनर्परीक्षेसाठी 1 लाख 17 हजार 395, तर एटीकेटीसाठी 41 हजार 65 विद्यार्थी पात्र

यंदा पुनर्परीक्षेसाठी 1 लाख 17 हजार 395, तर एटीकेटीसाठी 41 हजार 65 विद्यार्थी पात्र आहेत. पुनर्परीक्षेसाठी पुणे (15,636), नागपूर (15,419), छत्रपती संभाजीनगर (18,817), मुंबई (20,116), कोल्हापूर (56,76), अमरावती (13,701), नाशिक (15,295), लातूर (12,187), कोकण (548) अशा 1 हजार 17 हजार 395 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

तर एटीकेटीमध्ये पुणे (5,591), नागपूर (4,442), छत्रपती संभाजीनगर (6,904), मुंबई (6,819), कोल्हापूर (1,973), अमरावती (4,654), नाशिक (7,074), लातूर (3,344), कोकण (264), अशा 41 हजार 65 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT