गणेश खळदकर
पुणे: अध्यापन, संशोधन, नवोपक्रम, विद्यार्थी मार्गदर्शन आणि संस्थात्मक विकास, या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागामार्फत ‘राष्ट्रीय शिक्षक’ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. या पुरस्कारांचा गेल्या दशकभराचा विचार केला, तर देशात महाराष्ट्र दुसऱ्या, तर उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रातील 133, तर उत्तर प्रदेशच्या 144 शिक्षकांचा ‘राष्ट्रीय शिक्षक’ पुरस्काराने आत्तापर्यंत गौरव करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
2014 ते 2023 या दहा वर्षांचा विचार केला, तर 2014 ते 2017 या चार वर्षांच्या कालखंडातच मोठ्या प्रमाणात शिक्षकांना पुरस्कार देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दहा वर्षांच्या पुरस्कारांमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्रानंतर तामिळनाडू (112) आणि पश्चिम बंगाल (101) या दोनच राज्यांच्या 100 हून अधिक शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे. तर, कर्नाटक (77), केरळ (75), मध्य प्रदेश (72), राजस्थान (72), गुजरात (71), ओडीसा (57), आंध प्रदेश (51) आणि बिहार (51) या राज्यातील 50 हून अधिक शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे. तर, सर्वांत कमी लडाखमधील तीनच शिक्षकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन प्रमुख श्रेणींमध्ये विभागलेला आहे. पहिली श्रेणी उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षकांसाठी आहे. यामध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला, शुद्ध विज्ञान, कला, सामाजिक विज्ञान, मानविकी, भाषा, कायदा, वाणिज्य आणि व्यवस्थापन यांसारख्या विशेष शाखांचा समावेश आहे. उदयोन्मुख नवीन ज्ञान क्षेत्रांचाही या श्रेणीत समावेश केला जाऊ शकतो, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तर, दुसरी श्रेणी देशभरातील पॉलिटेक्निक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक आणि प्राध्यापकांसाठी आहे. या श्रेणीअंतर्गत, तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल शिक्षकांना सन्मानित केले जाणार आहे.
5 जुलैपर्यंत पात्र शिक्षकांना अर्ज करण्याची संधी
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यापीठे, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्था आणि पॉलिटेक्निकमध्ये कार्यरत असलेले पात्र शिक्षक ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 5 जुलै आहे. उमेदवार अधिकृत संकेतस्थळ हीींंीि://रुरीवी.र्सेीं.ळप/ वर जाऊन अर्ज करू शकतात.
...अशी आहे पात्रता
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी अर्ज करणारे उमेदवार महाविद्यालय, विद्यापीठ, उच्च शिक्षण संस्था किंवा पॉलिटेक्निकमध्ये नियमितपणे कार्यरत असावेत. त्यांना पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किमान पाच वर्षांचा पूर्णवेळ अध्यापनाचा अनुभव असावा. अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत उमेदवारांचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सध्या कार्यरत असलेले कुलगुरू, संचालक आणि प्राचार्य या पुरस्कारासाठी पात्र नाहीत. मात्र, ज्यांनी पूर्वी ही पदे भूषवली आहेत आणि जे सध्या अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत, ते अर्ज करू शकतात.