School Classroom Pudhari
पुणे

Maharashtra School Activity Workbooks Delay: दोन महिने उलटले तरी कृतीपुस्तिका नाहीत; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षाच!

प्रथम घटक चाचणी सुरू, गणेशोत्सवाची सुटी तोंडावर; वेळेत पुस्तिका न मिळाल्याने शिक्षक-पालक संभ्रमात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दोन महिने उलटले, तरी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप कृतीपुस्तिका पोहोचलेल्या नाहीत. पाठ्यपुस्तकातील धड्यांचा अभ्यास अधिक सोपा, रंजक आणि कृतीतून समजावून घेण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या या पुस्तिका प्रथम घटक चाचणी तसेच गणेशोत्सवाच्या सुटीच्या पार्श्वभूमीवरही विद्यार्थ्यांना मिळालेल्या नसल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कृतीपुस्तिका तयार करण्यात येतात. पाठ्यपुस्तकातील आशय केवळ वाचनापुरता मर्यादित न राहता विविध कृती, प्रश्न, उपक्रम आणि सरावाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तो समजावा, हा या पुस्तिकांचा प्रमुख उद्देश आहे.

विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला चालना देणे, निरीक्षणशक्ती विकसित करणे आणि अभ्यासाबाबत उत्सुकता निर्माण करण्यासाठी या पुस्तिका महत्त्वपूर्ण ठरतात. शिक्षक आणि पालकांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी संबंधित कृतीपुस्तिका अभ्यासक्रमासोबत पूर्ण करणे अपेक्षित असते. परंतु अभ्यासक्रमातील अनेक धडे शिकवून झाल्यानंतरही त्यासंदर्भातील कृती, उपक्रम आणि सराव विद्यार्थ्यांना करता आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुटीपूर्वी पुस्तिका मिळणार का?

प्रथम घटक चाचणीची प्रक्रिया सुरू असताना आणि गणेशोत्सवाची सुटी तोंडावर आलेली असतानाही कृतीपुस्तिकांचे वितरण पूर्ण झालेले नसल्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच कृतींचा सराव करून देण्यासाठी पुस्तिका नेमक्या कधी उपलब्ध होणार, याकडे आता शाळांचे लक्ष लागले आहे.

पाठ्यपुस्तकांसोबतच कृतीपुस्तकांचे वितरण करावे

शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. त्याचप्रमाणे कृतीपुस्तिकांचेही वेळेत वितरण झाल्यास विद्यार्थ्यांना प्रत्येक धड्यासोबत संबंधित कृती पूर्ण करता येतील. कृतीतून शिक्षण ही संकल्पना प्रभावीपणे राबवायची असेल, तर आवश्यक शैक्षणिक साहित्यही शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या हातात पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांसोबतच कृती पुस्तिकांचे वितरण करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT