School Pudhari
पुणे

Maharashtra School Curriculum Change: पाचवी, सातवी, नववी, अकरावीचा अभ्यासक्रम बदलणार; २०२७-२८ पासून विद्यार्थ्यांना नवी पुस्तके

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालभारतीची तयारी सुरू; सरकारी शाळांत पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलणार असून, विद्यार्थ्यांना नवी पुस्तके मिळणार आहेत. नव्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ अर्थात बालभारतीने आत्तापासूनच नियोजनाला सुरुवात केली आहे अशी माहिती ‘बालभारती’च्या संचालक अनुराधा ओक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२३ आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ च्या आधारे राज्यात शालेय शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे.

यंदाच्या वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. या पुस्तकांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये पुस्तकातील आशय, विद्यार्थ्यांची समज यासह अन्य गोष्टींचे मूल्यांकन केले जाणार असल्याचे देखील ओक यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारी शाळांत पहिल्या दिवशीच नवीन पाठ्यपुस्तके

साधारणतः पाचवी आणि सातवीचा अभ्यासक्रम जानेवारीमध्ये, तर नववीचा अभ्यासक्रम फेब्रुवारीमध्ये तयार होईल. त्यानंतर अकरावीचा नवीन अभ्यासक्रम तयार केला जाईल. अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर संबंधित इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम हाती घेतले जाईल.

पुढील शैक्षणिक वर्षात पालक आणि विद्यार्थ्यांना बाजारपेठेत लवकर पुस्तके उपलब्ध होतील. तसेच सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच नवीन पाठ्यपुस्तके मिळतील असे देखील ओक यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT