Maharashtra Sahitya Parishad  Pudhari
पुणे

Maharashtra Sahitya Parishad: महाराष्ट्र साहित्य परिषदेत अभूतपूर्व घडामोड; अध्यक्ष योगेश सोमण यांच्यासह तीन पदाधिकाऱ्यांविरोधात अविश्वास ठराव

कार्यकारिणीतील २० सदस्यांचे आक्षेप; ‘नांदी’ संमेलनाच्या नियोजनावरून वाद, शंभराव्या साहित्य संमेलनापूर्वी परिषदेतील मतभेद चव्हाट्यावर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: साहित्यविश्‍वातील आद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर या तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारे पत्र देत परिषदेच्या कार्यकारिणीतील सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करून मंगळवारी (दि. २७) सभात्याग केला. चर्चा न करता स्थानिक कार्यवाह यांच्यासह जिल्हा प्रतिनिधी सभागृहाबाहेर पडले. या सभात्यागानंतरही बैठक तहकूब करून गणसंख्येचे बंधन नसताना झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी नैमित्तिक कामकाजाची कार्यवाही केली. शंभरावे साहित्य संमेलन तीन महिन्यांवर असताना प्रमुख पदाधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इतिहासात प्रथमच घडल्याने साहित्यवर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची नियोजित बैठक मंगळवारी ( दि. २७) परिषदेत आयोजित केली होती. वार्षिक सभा पुढे ढकलण्यापासून मसापच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झालेल्या वादाची परिणती या बैठकीत अविश्वास ठराव दाखल केली. या बैठकीच्या सुरुवातीला स्थानिक कार्यवाह सुनील महाजन यांनी अविश्‍वास ठरावाचे पत्र दिले. उपस्थित २८ जणांपैकी २० जणांनी परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर या तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविषयी आक्षेप घेणारे पत्र सादर करून त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला. त्या पत्राचे वाचन प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक यांनी केले. त्यानंतर पत्रावर चर्चा सुरू होण्याआधीच पत्रावर स्वाक्षरी करणारे पदाधिकारी सभात्याग करून बाहेर पडले. त्यानंतर अर्धा तास बैठक तहकूब करण्यात आली. पुन्हा बैठक सुरू झाल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतरही परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा मुहूर्त केव्हा होणार हा प्रश्न अनुत्तरित राहिला.

अविश्वास ठरावातील हे आहेत मुद्दे...

  • जिल्हा प्रतिनिंधी, शाखा पदाधिकार्‍यांना मान सन्मान न देणे.

  • नांदी संमेलनाच्या आयोजनात शाखांना विश्‍वासात न घेणे.

  • मुख्य पदाधिकाऱ्यांचा शाखांशी संवाद नसणे.

  • दैनंदिन प्रशासकीय कामात अनियमितता, संस्थेला पुरेसा वेळ न देणे,

  • नांदी संमेलनात स्वत:च्या उपस्थितीचा आग्रह धरणे.

  • निर्णय घेताना स्थानिक कार्यवाहांना विश्‍वासात न घेणे.

साहित्य परिषदेच्या चार उपाध्यक्षपदांच्या नियुक्त्या

परिषदेच्या चार उपाध्यक्षांसह स्वीकृत सदस्य आणि ठाणे जिल्हा प्रतिनिधीची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी अहिल्यानगरचे नरेंद्र फिरोदिया, सोलापूरचे श्रीकांत मोरे, पुण्याचे कृष्णकुमार गोयल आणि चाळीसगावचे प्राचार्य तानसेन जगताप यांची नियुक्ती झाली आहे. स्वीकृत सदस्य म्हणून विद्यागौरी ताम्हणकर आणि कुणाल ओंबासे यांची, तर ठाणे जिल्ह्याच्या रिक्त प्रतिनिधीपदी ठाणे शाखेचे चांगदेव काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

घटनेतील तरतूद नेमकी काय?

  • पदाधिकार्‍यांविरोधात अविश्‍वास ठराव मांडायचा झाल्यास कार्यकारी मंडळाने (दोन तृतीयांश) बहुमताने व्यक्त केला पाहिजे.

  • कार्यवाहीपूर्वी संबंधित पदाधिकार्‍याला बाजू मांडण्यासाठी 15 दिवसांची लेखी पूर्वसूचना देऊन कार्यकारी मंडळाच्या सभेत मांडण्याची संधी दिली पाहिजे.

  • अविश्‍वास ठराव कार्यकारी मंडळात (दोन तृतीयांश) बहुमताने संमत झाल्यासवर तसे सबंधित व्यक्तीस प्रमुख कार्यवाहाने कळवावे. त्यानंतर तो पदाधिकारी पदापासून मुक्त झाल्याचे समजण्यात येईल.

  • अध्यक्षांसहित सर्व यांच्यापैकी कोणतेही पद रिक्त झाल्यास उर्वरित मुदतीसाठी कार्यकारी मंडळ सभेत नव्या पदाधिकार्‍याची नियुक्ती करतील.

  • कार्यकारी मंडळ रिक्त जागेवर उर्वरित मुदतीसाठी संबंधित वर्गातील सभासदाची कार्यकारी मंडळ बहुमताने नियुक्ती करू शकतात.

  • अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, पत्रिका संपादक आदी पदाधिकारी किंवा कार्यकारी मंडळाचा कोणताही सभासद यांच्याविरुद्ध योग्य कारणांसाठी अविश्वास ठराव करावयाचा झाल्यास अशा प्रकारचे लेखी मत कार्यकारी मंडळाने दोनतृतीयांश बहुमताने व्यक्त केले पाहिजे.

  • अशा कार्यवाहीपूर्वी संबंधित सभासदाला किंवा पदाधिकाऱ्याला आपली बाजू १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना देऊन कार्यकारी मंडळाच्या सभेत मांडण्याची संधी दिली पाहिजे.

  • अविश्वास ठराव कार्यकारी मंडळात दोनतृतीयांश बहुमताने संमत झाल्यावर तसे संबंधित व्यक्तीस प्रमुख कार्यवाहाने कळवावे. त्यानंतर तो सभासद किंवा पदाधिकारी आपल्या स्थानापासून मुक्त झाल्याचे समजण्यात येईल.

  • दरम्यान, धुळ्याचे प्रतिनिधी संजय गिरासे यांनी मला न सांगता माझी सही घेतली असून, मी सही मागे घेत असल्याचे पत्र परिषदेला दिले आहे. ठरावाच्या पत्रात काय लिहिले आहे, त्याची माहिती मला अजिबातच नाही. म्हणून माझी स्वाक्षरी मागे घेत आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

नेमके काय घडले..?

परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी कार्यकारिणीच्या सभेतील कामकाजाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, 'बैठक सुरू होताच सदस्यांनी उपस्थिती पत्रावर सह्या केल्या. बैठक सुरू होण्यापूर्वी अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष यांच्या उपस्थितीत स्थानिक कार्यवाह सुनील महाजन यांनी पदाधिकाऱ्यांच्या अविश्वास ठरावाचे वाचन करून चर्चेची मागणी केली. त्यांनी दिलेल्या अविश्वास ठरावाचे वाचन प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक यांनी केले. वाचन पूर्ण झाल्यावर अध्यक्ष योगेश सोमण यांनी चर्चेची तयारी दाखवली. परंतु 'मी वैयक्तिक कारणासाठी निषेध म्हणून सभात्याग करतो, असे सांगून महाजन सभागृहातून बाहेर पडले. त्यावेळी सभेला उपस्थित असलेले काही सदस्य कोणताही खुलासा न करता सभागृहाबाहेर पडले. यावर सोमण यांनी महाजन यांच्यासह सर्वांना 'आपण सगळे थांबा चर्चा करूया, अशी पुन्हा पुन्हा विनंती केली. परंतु सदस्यांनी त्यांचे ऐकले नाही. अध्यक्ष पुन्हा सभागृहाबाहेर गेले आणि त्यांनी पुन्हा एकदा आपण चर्चा करूया, अशी विनंती केल्यावरही सभात्याग करणारे सदस्य आणि महाजन यांनी ऐकले नाही. संस्थेचे पदाधिकारी आणि उपस्थित सभासदांनी सभात्याग करणाऱ्यांची अर्धा तास प्रतीक्षा केली. ते परत न आल्यामुळे प्रमुख कार्यवाह यांनी अध्यक्षांच्या परवानगीने तहकूब सभा सुरू करून कामकाज केले. मागील इतिवृत्ताला आणि अर्थसंकल्प मांडून त्याला मंजुरी देण्यात आली. परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला असला तरी वार्षिक सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरी घ्यावी लागते, असेही निफाडकर यांनी सांगितले.

‘नांदी’च्या नियोजनात स्थानिक शाखेला डावलले!

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित नांदी संमेलनाच्या नियोजनावरून महाराष्ट्र साहित्य परिषदेत (मसाप) मतभेद निर्माण झाले आहेत. स्थानिक शाखेला विश्वासात न घेता नियोजन केल्याचा आरोप बार्शी शाखेचे अध्यक्ष पांडुरंग निपाणीकर आणि कार्याध्यक्ष डॉ. रविराज फुरडे यांनी पत्राद्वारे केला आहे. मात्र, बार्शीतील संमेलनाचे आयोजन अन्य कोणत्याही संस्थेला दिलेले नसून, स्थानिक शाखेच्या सहभागातूनच कार्यक्रम होणार असल्याचे मसापचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी स्पष्ट केले आहे.

निपाणीकर यांच्या म्हणण्यानुसार, पुणे आणि बार्शी शाखेच्या वतीने प्रारंभी २७ ऑगस्टला नांदी संमेलन आयोजित करण्याचे ठरले होते. तांत्रिक कारणांमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर सोमण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ६ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यानुसार कार्यक्रमपत्रिका तयार करून मुख्य शाखेकडे पाठविण्यात आली; मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, बार्शीत ३१ ऑक्टोबरला संमेलन होणार असल्याची माहिती कार्यकारिणी सदस्याकडून मिळाली. स्थानिक शाखेला विश्वासात न घेता नियोजन करणे हा शाखेचा अवमान असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. यावर बार्शी शाखेला संमेलनाच्या आयोजनातून वगळले नसल्याचे सोमण यांनी सांगितले. मसापच्या शाखा असलेल्या ठिकाणी स्थानिक शाखेच्या सहभागानेच नांदी संमेलने आयोजित केली जावीत, अशी परिषदेची भूमिका आहे. बार्शीतील आयोजनाची जबाबदारी अन्य संस्थेला दिल्याचे पत्र असल्यास ते दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. काटकसरीने आयोजन करण्याच्या दृष्टीने दिवाळीनंतरच्या तारखा कळविण्याची सूचना करण्यात आली असून, संमेलनाच्या आयोजनाची तारीख बार्शी शाखेला लवकरच कळविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT