पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेतील (मसाप) अविश्वास ठरावावरून निर्माण झालेल्या वादाला आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे. मसापच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांविरोधात कार्यकारी मंडळाने दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी कार्यकारी मंडळाची २८ नोव्हेंबरला बैठक बोलावली आहे. ही बैठक सकाळी ११ वाजता परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.
या बैठकीत अविश्वास ठरावाचे पुढे काय होणार, संबंधित पदाधिकारी आपली बाजू कशी मांडणार आणि मतभेद संपणार का? याकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, त्यापूर्वी पुण्यात २३ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शक समितीची आणि २४ नोव्हेंबर रोजी साहित्य महामंडळाची होणारी बैठक नियोजनानुसार होणार असल्याची माहिती महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक यांनी दिली.
'मसाप'चे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्या कामकाजाबाबत आक्षेप घेत परिषदेच्या कार्यकारी मंडळाने २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत अविश्वास ठराव मांडला. या ठरावावर काही स्थानिक कार्यवाह आणि जिल्हा प्रतिनिधी अशा २१ सदस्यांची स्वाक्षरी आहे.
मसापच्या घटनेनुसार, अविश्वास ठरावाला सामोरे जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत देणे आवश्यक आहे. त्यानंतर ठरावावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली जाते. याच प्रक्रियेनुसार २८ नोव्हेंबरची बैठक निश्चित केली आहे. या बैठकीत तिन्ही पदाधिकारी अविश्वास ठरावाच्या प्रस्तावपत्रावर आपला खुलासा मांडतील. त्यानंतर सदस्यांमध्ये चर्चा होऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
अविश्वास ठराव मांडण्याची पहिलीच वेळ
साहित्य परिषदेच्या आजवरच्या इतिहासात अशाप्रकारे पदाधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून संवादाचा अभाव, कार्यकारी मंडळाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप, आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता नसणे, नांदी संमेलनांच्या आयोजनातील अनियमितता, अशा विविध मुद्द्यांवरून नाराजी व्यक्त केली जात होती. त्याची परिणीती अविश्वास ठरावामध्ये झाली.