पुणे: महाराष्ट्रातील महत्त्वाची साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. निवडणुका म्हटल्यावर आरोप-प्रत्योरापांचा धुरळा आलाच. विद्यमान कार्यकारिणीचे परिवर्तन उत्कर्ष आघाडी पॅनेल, प्रतिस्पर्धी साहित्य संवर्धन आघाडी पॅनेल यांचा एकमेकांविरुद्ध हल्लाबोल सुरू आहेच. त्यात महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोप होत आहेत. शनिवारी (दि. 31) असेच आरोप-प्रत्यारोपांचे चित्र पाहायला मिळाले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी शनिवारी (दि. 31) पत्रकार परिषेदत केला. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही कुलकर्णी यांनी केली आहे. तसेच, हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. या वेळी कुलकर्णी यांनी प्रतिस्पर्धी साहित्य संवर्धन आघाडीच्या प्रचारासाठी आयोजित ऑनलाइन बैठकीचे रेकॉर्डिंग पत्रकार परिषदेत दाखविले. या ऑनलाइन बैठकीमध्ये पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठिंब्याने साहित्य परिषद ताब्यात घेण्याचे विधान केल्याचा दावाही कुलकर्णी यांनी केला आहे. परिषदेच्या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडी या नावाने राजेश पांडे यांनी पॅनेल उभे केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कुलकर्णी म्हणाले की, राजेश पांडे यांनी 26 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता राजेंद्र नन्नावरे यांच्या निमंत्रणावरून आयोजित केलेल्या एका झूम मीटिंगमध्ये साहित्य संवर्धन आघाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचा उल्लेख केला आहे. खरेतर मी मुख्यमंत्री असेपर्यंत साहित्य संस्थांची स्वायत्तता अबाधित राहील. कोणत्याही साहित्य संस्थेत सरकार लक्ष घालणार नाही किंवा हस्तक्षेप करणार नाही, असे फडणवीस यांनी त्यांच्या सातारा संमेलनातील भाषणात सांगितले होते. मात्र, संमेलन होऊन महिना होण्यापूर्वीच त्यांना खोटे ठरविण्याचा उद्योग सुरू आहे. विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव आले, त्या वेळी त्यांनी ज्याप्रमाणे तातडीने लेखी उत्तर दिले, त्याप्रमाणेच फडणवीस यांनी लेखी पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट करावी. योगेश सोमण यांच्या नावाने आपण पॅनेल करतो आहोत, हे या क्लिपमध्ये पांडे यांनी उघड म्हटलेले आहे. त्यामुळे योगेश सोमण यांच्यासह त्यांच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी आम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. पांडे हे छुप्या पद्धतीने आणि पडद्यामागून या पॅनेलला पाठिंबा देत आहेत. साहित्य परिषद ताब्यात घेण्याची योजना आखत आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीत हस्तक्षेप करणाऱ्या या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, असे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना परिवर्तन उत्कर्ष आघाडीने दिले असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. या परिषदेला प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार आणि डॉ. सतीश देसाई उपस्थित होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीतील साहित्य संवर्धन आघाडीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या खासगी ऑनलाइन बैठकीचे (झूम मीटिंग बैठक) बेकायदा रेकॉर्डिंग करून त्याचे चित्रीकरण पत्रकार परिषदेत दाखवून बदनामी केल्याचा आरोप परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे उमेदवार विनोद कुलकर्णी यांच्यावर राजेंद्र नन्नावरे यांनी केला आहे. कुलकर्णी यांच्याविरोधात नन्नावरे यांनी जळगाव येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल कली. संबंधित बैठकीत काहीही आक्षेपार्ह नसताना विनाकारण कुलकर्णी यांनी आपली बदनामी केली असून, गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप बैठकीच्या आयोजकांनी केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मसापची निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याच धर्तीवर परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन शनिवारी (दि. 31) काही आरोप केले. त्याच पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करणाऱ्या राजेंद्र लखीचंद नन्नावरे (वय 56, रा. जळगाव) यांनी याविषयी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 26 जानेवारी 2026 रोजी मसापच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनासाठी खासगी ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या रेकॉर्डिंगसाठी कोणतीही संमती दिली नव्हती. मात्र, विनोद कुलकर्णी यांनी या बैठकीचे रेकॉर्डिंग केल्याने गोपनीयतेचा भंग केला. त्यानंतर कुलकर्णी यांनी या रेकॉर्डिंगचा वापर करून पुण्यात पत्रकार परिषद घेत खोटी आणि बदनामीकारक विधाने केली आहेत, असे नन्नावरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
उणीदुणी काढत विरोधक साहित्य क्षेत्रात आणताहेत राजकारण : विनोद कुलकर्णी
शनिवारी (दि. 31) झालेल्या पत्रकार परिषदेत परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे विनोद कुलकर्णी यांनी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांच्यावर काही आरोप केले. पांडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत अभिजात मराठी भाषेतील साहित्य संवर्धनाविषयी ऊहापोह होणे अपेक्षित आहे. याच प्रकारचा प्रचार साहित्य प्रेमी मतदारांना अपेक्षित आहे. परंतु, विरोधक उणीदुणी काढत, यात राजकारण आणत आहेत, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
साहित्य परिषद ही विद्यमान कार्यकारिणीची मक्तेदारी नाही : मसाप संरक्षण कृती समिती
विद्यमान कार्यकारिणी आणि परिवर्तन उत्कर्ष आघाडी हे पॅनेल बेकायदेशीर असून, दबाव तंत्र वापरून महाराष्ट्र साहित्य परिषद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समिती पुणेचे कार्याध्यक्ष धनंजय कुलकर्णी आणि निमंत्रक शशांक महाजन यांनी शनिवारी (दि. 31) पत्रकार परिषदेत केला. विद्यमान कार्यकारिणीविरोधात लढा सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधी आघाडी उमेदवारांच्या खासगी बैठकीचे चित्रण सार्वजनिक करणे, हे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.