Maharashtra Red Alert 19 August Heavy Rainfall IMD
पुणे : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आता आपला मोर्चा मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडे वळवला आहे. येणारे दोन दिवस, म्हणजेच बुधवार (दि. २०) आणि गुरुवार (दि. २१), या भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, आता कोकण आणि घाटमाथ्यावर वरुणराजाची कृपा'दृष्टी' वक्र झाली आहे.
राज्यात पावसाच्या या जोरदार पुनरागमनामागे एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन हवामान प्रणाली कार्यरत आहेत.
बंगालचा उपसागर : बंगालच्या उपसागरापासून आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीपर्यंत एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे, जे पुढील १२ तासांत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होणार आहे.
अरबी समुद्र : ईशान्य अरबी समुद्रापासून गुजरातपर्यंत हवेच्या वरच्या थरात एक चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.
द्रोणीय स्थिती : दक्षिण कोकणापासून उत्तर केरळपर्यंत एक द्रोणीय स्थिती (Trough) तयार झाली आहे.
या तिहेरी संगमामुळे राज्यात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान खात्याने विविध जिल्ह्यांसाठी खालीलप्रमाणे अलर्ट जारी केले आहेत :
रेड अलर्ट (अतिवृष्टीचा इशारा)
१९ ऑगस्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट.
ऑरेंज अलर्ट (मुसळधार पावसाची शक्यता)
१९ ऑगस्ट : सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली.
२० ऑगस्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट.
२१ ऑगस्ट : पुणे घाट.
यलो अलर्ट (मध्यम पावसाची शक्यता)
१९ ऑगस्ट : सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे शहर, कोल्हापूर, गडचिरोली, तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्हे.
२० ऑगस्ट : सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्हे.
२१ ऑगस्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, सातारा घाट, पुणे शहर, सातारा शहर.
२२ ऑगस्ट : पुणे घाटमाथा.
राज्याच्या विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. काही प्रमुख आकडेवारी खालीलप्रमाणे:
कोकण किनारपट्टी: जलधारांचा अभिषेक
सावडे: २७७
म्हसळा: २१५
दापोली: १८८
कणकवली: १७२
खेड: १६५
रत्नागिरी: १५४
मध्य महाराष्ट्र: डोंगरांवर सरींचा वर्षाव
गगनबावडा: १४२
राधानगरी: १२५
महाबळेश्वर: १२०
लोणावळा: ७३
मराठवाडा : दमदार हजेरी
अहमदपूर: १२२
किनवट: ११०
उदगीर: ९९
कंधार: ९०
परळी वैजनाथ: ८३
विदर्भ: रिमझिम बरखा
मालेगाव: ८२
मेहकर: ६३
रिसोड: ४६
देऊळगाव राजा: ४४
घाटमाथा : पावसाचे रौद्ररूप
कोयना (नवजा): १७४
कोयना (पोफळी): १६३
दावडी: ११०
लोणावळा (ऑफिस): १०६